भारतीय संघाचा ऐतिहासिक विजय आणि कोहलीचा दैदिप्यमान शतक!

क्रिकेट हा केवळ खेळ नाही, तो भावना आहे. जेव्हा भारतीय संघ जिंकतो आणि त्यात विराट कोहलीसारख्या खेळाडूचा शतकासह सहभाग असतो, तेव्हा तो विजय आणखी गोड ठरतो. आजही असाच एक दिवस होता, ज्या दिवशी विराटने त्याच्या फलंदाजीने आपल्याला पुन्हा एकदा मोहित केले.
विराटचा पुनरागमनाचा ऐतिहासिक क्षण
बराच काळ झाला विराटच्या शतकाची आतुरतेने वाट पाहत होतो. आज त्याने पुन्हा एकदा त्याच्या बॅटने उत्तर दिलं. पहिल्या चेंडूपासूनच तो एका वेगळ्याच लयीत दिसत होता. त्याने एकेरी-दुहेरी धावांवर भर दिला, त्याच्या फटक्यांत जुन्या विराटची झलक होती. विशेषतः त्याचे एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह तर डोळ्यांचे पारणे फेडणारे होते.
पाकिस्तानची निराशाजनक फलंदाजी
टॉस जिंकून फलंदाजी घेतलेल्या पाकिस्तानने सुरुवातीपासूनच संथ खेळ केला. भारतीय गोलंदाजांनी आपल्या अचूक माऱ्याने त्यांना कोणतीही संधी दिली नाही. शमी, हार्दिक, कुलदीप आणि अक्षर पटेल यांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना अक्षरशः गुंडाळून टाकले. बाबर आजमला स्वस्तात बाद करून हार्दिकने भारतीय संघाला मोठी सुरुवात करून दिली. पाकिस्तानच्या फलंदाजीची संथ गती पाहून स्टेडियममधील काही चाहत्यांनी झोप काढली असं दृश्यही टीव्हीवर झळकलं!
हेही वाचा : मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी कटीबद्ध व्हावे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
भारतीय संघाचा धडाकेबाज पाठलाग
रोहित शर्मा आणि शुभमन गिलने आक्रमक सुरुवात करत पाकिस्तानच्या गोलंदाजांना चक्रावून टाकले. शुभमनने काही अप्रतिम फटके खेळून पुन्हा सिद्ध केलं की, तो भारतीय संघाचा उज्ज्वल तारा आहे. रोहितही आपल्या शैलीत खेळला आणि चेंडू सीमारेषेपार टोलवत गेला.
यानंतर मैदानावर आला तोच क्षण—विराट कोहली! त्याला श्रेयस अय्यरची उत्तम साथ लाभली. ही जोडी सहजतेने धावसंख्या पुढे नेत होती. विराटच्या खेळीत आत्मविश्वास झळकत होता. त्याने ९० च्या पुढे पोहोचताच संपूर्ण स्टेडियम “कोहली, कोहली!” अशा जल्लोषात दुमदुमून गेलं. अखेर, त्याने एका शानदार फटक्यासह त्याचे शतक पूर्ण केले आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं!
आता पुढील लक्ष्य – चॅम्पियन्स ट्रॉफी!
हा विजय केवळ एक सामना जिंकण्याचा नव्हता, तर भारतीय संघाच्या दिमाखदार फॉर्मचे प्रतीक होता. विराटच्या शतकाने आणि भारतीय संघाच्या अचूक खेळाने हे सिद्ध केले की, आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीही आपल्या नावावर करण्याची क्षमता आपल्याकडे आहे.
इतकेच… भारतीय संघाचा विजय असाच कायम राहो!
धन्यवाद!
लेखक: हर्षल आल्पे