फिडे विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेत अर्जुन एरिगेसीचा पराभव
चीनच्या ग्रँडमास्टर वेई यीने उपांत्य फेरी गाठली
पणजी : भारताचा अव्वल मानांकित बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसी याला टायब्रेक फेरीत भक्कम व्यूहरचना राखणे शक्य झाले नाही, त्याचा लाभ उठवत चीनचा ग्रँडमास्टर वेई यी याने उपांत्य फेरी गाठली. या पराभवाने यजमानांचे फिडे विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेतील आव्हान गुरुवारी संपुष्टात आले.
उत्तर गोव्यातील हडफडे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील दोन्ही क्लासिकल डाव बरोबरीत राहिल्यानंतर गुरुवारी अर्जुन व वेई टायब्रेक फेरीत आमनेसामने आले. अर्जुनने काळ्या मोहऱ्यांसह खेळताना पहिल्या टायब्रेक डावात फ्रेंच बचावाचा अवलंब केले.
डावाच्या मध्यास तो अडचणीत होता, मात्र चिनी खेळाडूने २६व्या चालीत चूक केली, त्यामुळे अर्जुनला सावरण्याची संधी मिळाली व अखेरीस डाव ६६व्या चालीत बरोबरीत राहिला. दुसऱ्या डावात अर्जुन पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळत होता. वेई याचा पेत्रोव बचाव भेदण्याचा भारतीय ग्रँडमास्टरने प्रयत्न केला, पण चिनी खेळाडूने रणनीती बदलली नाही. आव्हान राखण्यासाठी अर्जुनने कसोशीने प्रयत्न केले, परंतु ७९व्या चालीत अर्जुनचा पराभव निश्चित झाला आणि त्याला माघार घेणे भाग पडले.
हेही वाचा – भारत-अमेरिकेत शस्त्रांसंबंधी मोठा करार ; ९३ दशलक्ष डॉलर्सच्या लष्करी पॅकेजला मंजुरी
फिडे विश्वकरंडकात तेलंगणमधील वारंगल येथील २२ वर्षीय अर्जुन याला पुन्हा एकदा उपांत्यपूर्व फेरीतील टायब्रेकरमध्ये पराभवाचा धक्का सहन करावा लागला. दोन वर्षांपूर्वीही या स्पर्धेत त्याचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले होते, तेव्हा भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याने उपांत्यपूर्व फेरीच्या टायब्रेक डावांत मात दिली होती. इतक्या मजबूत परिस्थितीत विजय मिळविल्याबद्दल मी खूप आनंदी आहे,” असे टायब्रेक फेरी जिंकल्यानंतर वेई यी याने सांगितले.
उपांत्य झुंजी
उपांत्यपूर्व फेरीतील इतर टायब्रेक डावांत फिडेचे प्रतिनिधित्व करणारा ग्रँडमास्टर आंद्रे एसिपेंको व उझबेकिस्तानचा ग्रँडमास्टर जावोखिर सिंदारोव यांनी विजयी कामगिरी साधली. एसिपेंको याने अमेरिकन ग्रँडमास्टर सॅम शँकलँड याला, तर जावोखिर याने मेक्सिकन ग्रँडमास्टर होजे एदुआर्द मार्टिनेझ अल्कांतारा याला पराभूत केले. अन्य एक उझबेक ग्रँडमास्टर नोदिरबेक याकुबोएव याने मंगळवारीच उपांत्य फेरी निश्चित केली होती. आता अखेरच्या चार खेळाडूंच्या फेरीत एसिपेंको याच्यासमोर वेई यी याचे आव्हान असेल, तर जावोखिर देशवासीय नोदिरबेक याच्याविरुद्ध खेळेल.





