“मला २०१९ च्या विश्वचषकात खेळायचं होतं पण…”; युवराजचा गौप्यस्फोट

भारतीय संघ २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत न्यूझीलंड विरूद्ध पराभूत झाला. सुमार फलंदाजीचा भारतीय संघाला फटका बसला. त्यामुळे तिसरा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचं भारताचं स्वप्न अपूर्णच राहिलं. या सामन्यानंतर या स्पर्धेबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. पण आता बऱ्याच काळाने पुन्हा विश्वचषक स्पर्धा चर्चेत आली आहे. मला २०१९ ची विश्वचषक स्पर्धा खेळायची होती, पण निवड समिती आणि संघव्यवस्थापनाने त्याबाबत माझ्याशी काहीच चर्चा केली नाही, असा गौप्यस्फोट भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग याने केला.
“मला २०१९ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत खेळायची इच्छा होती. मी आवश्यक असणारी यो-यो टेस्ट पास केली होती. तसेच माझी २०१७ पासूनची कामगिरीदेखील उत्तम होती. पण संघ व्यवस्थापनाने माझ्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा केली नाही. इतकेच नव्हे तर माझ्या क्रिकेटमधील शेवटच्या टप्प्यात म्हणजेच निवृत्तीच्या आधीच्या काही काळातदेखील कोणीच माझ्याशी फारशी चर्चा केली नाही,” असा खुलासा युवराजने केला.





