breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

पिंपरी- चिंचवड: ताथवडेत चार स्कूलबसमध्ये स्फोट, अवैध गॅस रिफिलिंगमुळे स्फोट

काही लोक 21 टन प्रोपीलीन गॅस कॅप्सूल टँकरमधून बेकायदेशीरपणे घरगुती गॅस आणि व्यावसायिक सिलिंडर भरत होते

पिंपरीः पिंपरी- चिंचवडमधील ताथवडे येथील जेएसपीएम शाळेच्या परिसरात तीन ते चार स्कूलबसला अचानक आग लागल्याने मोठा स्फोट झाला. यामुळे खळबळ उडाली आहे. स्फोटांच्या आवाजाने विद्यार्थी आणि नागरिक रस्त्यावर धावू लागले. धूर आणि आगीचे लोळ काही किलोमीटर अंतरावरून दिसत होते. ज्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्कूल बस सीएनजी गॅसवर चालत होती आणि त्यात मोठा स्फोट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या शाळेच्या बसेस जेएसपीएम कॉलेज कॅम्पसमध्ये उभ्या करण्यात आल्या आहेत. या सर्व बसेस गॅसवर चालणाऱ्या असून, रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास अचानक तीन ते चार बसेसने पेट घेतला. पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पिंपरी-चिंचवडमधील ताथवडे येथे अवैध गॅस रिफिलिंग सुरू असताना हा भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. कॅप्सूल टँकरमध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरला जात असताना तीनहून अधिक भीषण स्फोट झाले. त्यामुळे आजूबाजूच्या तीन-चार स्कूल बसेसने पेट घेतला. त्या ठिकाणी नऊ गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे.

पोलीस आणि अग्निशमन दलाच्या म्हणण्यानुसार, काही लोक 21 टन प्रोपीलीन गॅस कॅप्सूल टँकरमधून बेकायदेशीरपणे घरगुती गॅस आणि व्यावसायिक सिलिंडर भरत होते. गॅस भरत असताना तो गळती होऊन विजेच्या संपर्कात आला, त्यामुळे भीषण स्फोट झाला. तीनहून अधिक स्फोटांमुळे परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांची इकडे-तिकडे धावपळ सुरू झाली. धूर आणि ज्वाळा कित्येक किलोमीटर दूर दिसत होत्या. या भीषण स्फोटाचा आवाज अनेक किलोमीटरपर्यंत पोहोचल्याची माहिती स्थानिक लोकांनी दिली आहे. स्फोटामुळे अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्या लोकांनी तेथून पळ काढला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

एकापाठोपाठ नऊ गॅस सिलिंडर फुटल्याने हा भीषण स्फोट झाल्याचे अग्निशमन विभागाने सांगितले. गॅस पसरल्याने शेजारी उभ्या असलेल्या तीन ते चार स्कूल बस जळून खाक झाल्या. घटनेची माहिती मिळताच पिंपरी, थेरगाव, प्राधिकरण, रहाटणी, चिखली, भोसरी, तळवडे, हिंजवडी एमआयडीसी येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आग आटोक्यात आणली असून, ती विझवण्यात यश आले आहे. याशिवाय पिंपरी-चिंचवड पोलिसांचा मोठा ताफाही घटनास्थळी दाखल झाला होता. या घटनेने पिंपरी-चिंचवड शहरात अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्या टोळीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याआधीही गॅस रिफिलिंग दरम्यान काही लोकांचा मृत्यू झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे पोलिसांनी तात्पुरती कारवाई करण्यापेक्षा अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी कारवाई करणे आता गरजेचे झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button