breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

SL vs IND 1st T20 : भुवनेश्वर कुमारसमोर श्रीलंकेची घसरगुंडी, ‘धवनसेने’ची विजयी सलामी

कोलंबो – भारताने पहिल्या  टी२० सामन्यात श्रीलंकेचा ३८ धावांनी पराभव करत मालिकेत १ – ० अशी आघाडी घेतली. भारतने ठेवलेल्या १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लंकेचा संपूर्ण संघ १२६ धावांत पॅव्हेलियनमध्ये परतला.भारताकडून भुवनेश्वर कुमारने ४ तर दीपक चाहरने २ विकेट घेत दमदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले. तर फलंदाजीत सूर्यकुमार यादवने अर्धशतकी ( ५० ) खेळी केली. तर कर्णधार शिखर धवनने ४६ धावांची खेळी करत चांगली सुरुवात करुन दिली.

भारत आणि श्रीलंका  यांच्यातील पहिल्या टी २० सामन्यात भारताने ठेवलेल्या १६५ धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताने श्रीलंकेने धडाकेबाज सुरुवात केली. सलामीवीर अविष्का फर्नांडो आणि मिनोद भानुका यांनी २ षटकात २० धावा ठोकून काढल्या.त्यानंतर मात्र कृणाल पांड्याने भानुकाला १० धावांवर बाद करत श्रीलंकेला पहिला धक्का दिला. भानुका बाद झाल्यानंतर फर्नांडोने धनंजया डि सिल्वाच्या साथीने श्रीलंकेला ६ षटकात ४६ धावांपर्यंत पोहचवले.

मात्र पॉवर प्लेनंतर भारतीय गोलंदाजांनी पुनरागमन केले. यझुवेंद्र चहलने धनंजया डि सिल्वाला ९ धावांवर बाद केले. त्यानंतर पुढच्याच षटकात भुवनेश्वर कुमारने सेट झालेला सलामीवीर फर्नांडोला २६ धावांवर माघारी धाडले. त्यामुळे श्रीलंकेची अवस्था १ बाद ४६ वरुन ३ बाद ५० अशी झाली.

लंकेचा डाव घसरला
श्रीलंकेची वरची फळी ढेपाळल्यानंतर चरीथ असलंका आणि अशेन बंडारा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, पाठोपाठ विकेट पडल्याने धावगती मंदावली. चरीथ असलंकाने ही धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी १२ व्या षटकापर्यंत श्रीलंकेला ८२ धावांपर्यंत पोहचवले.

चरीथ असलंकाने दमदार फलंदाजी करत २५ चेंडूत ४४ धावांची खेळी केली. त्याने लंकेला शतकाजवळ पोहचवले. दरम्यान, हार्दिक पांड्याने अशेन बंडाराला ९ धावांवर बाद करत लंकेला चौथा धक्का दिला. पांड्यानंतर १६ वे षटक टाकणाऱ्या दिपक चाहरने लंकेला मोठा धक्का देत असलंकाला ४४ धावांवर बाद केले. त्यानंतर त्याच षटकात वानिंदू हसरंगाला शुन्यावर बाद करत लंकेला सहावा धक्का दिला.

भुवीचा भेदक मारा
लंकेचे सहा फलंदाज माघारी गेल्यानंतर कर्णधार दसून शनकावर लंकेच्या डावाची जबाबदारी आली. त्याच्या जोडीला चमिका करुणारत्ने होता. मात्र या दोघांनाही भुवनेश्वर कुमार आणि वरुण चक्रवर्ती यांनी फारशी संधी दिली नाही. भुवनेश्वरने करुणारत्नेला ३ धावांवर तर चक्रवर्तीने शनकाला १६ धावांवर बाद केले.

लंकेचे ८ फलंदाज बाद झाल्याने त्यांची धावगती मंदावली. भुवनेश्वरने लंकेची शेपटी लवकर गुंडाळण्याचा प्रयत्न करत इसरु उडाना आणि चमीराला १ धावेवर बाद केले. लंकेचा डाव १२६ धावात गुंडाळला.

शॉचे शुन्याने पदार्पण 
श्रीलंकेने फलंदाजीला पाचारण केलेल्या भारताची सुरुवात खराब झाली. पृथ्वी शॉचे टी२० पदार्पण कसोटी आणि एकदिवसीय प्रमाणे धडाक्यात झाले नाही. तो सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याला चमिराने बाद केले. पृथ्वी शॉ बाद झाल्यानंतर शिखर धवन आणि संजू सॅमसन यांनी भारताला आक्रमक सुरुवात करुन देण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी सहा षटकात संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले.

मात्र त्यानंतर हसरंगाने संजू सॅमसनला २७ धावांवर बाद करत भारताला दुसरा धक्का दिला. सॅमसन बाद झाल्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादव आणि शिखर धवन यांनी भारताचा डाव पुढे नेत संघाला १० षटकात ७८ धावांपर्यंत मजल मारून दिली.

शिखर – सूर्यकुमारची फटकेबाजी
१० षटकानंतर शिखर धवनने आपला पवित्रा बदलत आक्रमक फटकेबाजी सुरु केली. दुसऱ्या बाजूने त्याला सूर्यकुमार यादव चांगली साथ देत होता. पण, करुणारत्नेने शिखर धवनला ४६ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. दरम्यान, सूर्यकुमार यादवने देखील आक्रमक फलंदाजी सुरु केली होती.

त्याने ३४ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५० धावा केल्या. मात्र त्यानंतर हसरंगाने त्याला बाद करत त्याची ही अर्धशतकी खेळी संपवली. शिखर आणि सूर्यकुमार दोघेही बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या आणि इशान किशन यांनी संघाला १५० चा टप्पा पार करुन दिला.इशान किशनने १४ चेंडूत २० धावांची उपयुक्त खेळी केली. तर पांड्याला आपला जलवा दाखवता आला नाही. तो १२ चेंडूत १० धावा करुन चमिराचा शिकार बनला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button