ताज्या घडामोडीमुंबई

सर्वसामान्यांना महागाईचा दुहेरी झटका; सीएनजी, पाइप गॅसच्या दरांमध्ये पुन्हा वाढ

 मुंबई | प्रतिनिधी

 संपूर्ण महामुंबई परिसरात घरगुती पाइप गॅस व वाहनांसाठी सीएनजीचा पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) दरात पुन्हा वाढ केली आहे. सीएनजी ५ रुपये प्रति किलो तर पाइप नैसर्गिक वायूच्या दरात ४.५० रुपये प्रति घनमीटरने वाढ करण्यात आली. यामुळे आता सीएनजी ७२ रुपये तर स्वयंपाकासाठीचा पाइप गॅस ४५.५० रुपये प्रति घनमीटरवर पोहोचला आहे. नवीन दर १२ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लागू होतील. ही आठ दिवसांतील दुसरी मोठी दरवाढ आहे.

एमजीएल ही महामुंबईतील जवळपास १६ लाख ग्राहकांना पाइपने गॅस (पीएनजी) पुरवठा करते. या गॅसच्या दरात कंपनीने ऑक्टोबर ते जानेवारीदरम्यान ६ रुपये ३७ पैसे प्रति घनमीटर (एससीएम) वाढ केली होती. त्यानंतर राज्य सरकारने व्हॅटमध्ये घट केल्याने १ एप्रिलपासून पीएनजी दरात साडेतीन रुपयांची घट झाली. पण त्याचा आनंद सर्वसामान्यांना जेमतेम पाच दिवसच घेता आला. कंपनीने ६ एप्रिलला पीएनजीच्या दरात प्रति एससीएम ५ रुपयांची वाढ केली. यामुळे आता महामुंबई क्षेत्रात पीएनजी ४१ रुपये प्रति एससीएम झाले. त्यानंतर आठ दिवसांत महानगर गॅसने दुसरी मोठी दरवाढ करीत ग्राहकांना धक्का दिला.

मुंबईत सर्वाधिक संख्येने धावणाऱ्या ऑटोरिक्षा, टॅक्सी, अॅपआधारित कॅब यांचासुद्धा खिसा हलका होणार आहे. या वाहनांमध्ये लागणाऱ्या सीएनजी दरात महानगर गॅस लिमिटेडने ऑक्टोबर ते जानेवारीदरम्यान ११.४३ रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर व्हॅटमधील कपातीमुळे १ एप्रिलपासून सीएनजी ६ रुपये प्रति किलोने स्वस्त झाले. वाहनचालकांसाठीचा हा दिलासा अल्पकाळ ठरला. ६ एप्रिलपासून एमजीएलने सीएनजी तब्बल ७ रुपये प्रति किलोने महाग केले. यामुळे नवे दर ६७ रुपये प्रति किलो झाले होते. त्यानंतर सीएनजीच्या दरातदेखील १२ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून दरवाढ करण्यात आली.

महानगर गॅसने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, ‘१ एप्रिल, २०२२पासून देशांतर्गत उत्पादित नैसर्गिक वायूच्या विक्रीच्या किंमतीत केंद्र सरकारने ११० टक्क्यांची वाढ केली. शिवाय सीएनजी आणि घरगुती गॅसच्या उपलब्धतेतील कमतरता भरून काढण्यासाठी ‘री-गॅसिफाइड’ द्रवरूप नैसर्गिक वायूमिश्रित केला जात आहे. या द्रवरूप वायूचे दर महागल्याचाही परिणाम झाला आहे. त्यामुळेच किंमतीत वाढ करावी लागली आहे.’

दरवाढ-कपात अशी (रुपयांत)

सीएनजी (प्रति किलो) पीएनजी (प्रति एससीएम)

१४ ऑक्टोबर २.९७ १.११

२८ नोव्हेंबर ३.९६ २.२६

१७ डिसेंबर २.०० १.५०

८ जानेवारी २.५० १.५०

६ एप्रिल ७.०० ५.००

१३ एप्रिल ५.०० ४.५०

दर कपात

१ एप्रिल ६.०० ३.५०

अशी झाली वाढ

सीएनजी (प्रति किलो)

वाढ : ५ रुपये

नवा दर : ७२ रुपये

घरगुती पाइप गॅस (प्रति घनमीटर)

वाढ : ४.५० रुपये

नवा दर : ४५.५० रुपय़े

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button