breaking-newsताज्या घडामोडीपुणे

Shocking News : परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करीत आहोत…पुण्यातील धक्कादायक घटना

सुखसागरनगर भागात दोन चिमुकल्यांसह आई-वडिलांची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी

सुखसागरनगर या भागात दोन चिमुकल्यांचा खून करून आई-वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली आहे. दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली असावी, असा अंदाज आहे.

शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता चौघांचे गळफासाला लटकलेले मृतदेह आढळून आले. आत्महत्येचे नेमके कारण अद्यापि स्पष्ट होऊ शकलेले नाही.  अतुल दत्तात्रय शिंदे (वय 33), जया अतुल शिंदे (वय 30) तसेच त्यांचा मुलगा ऋग्वेद अतुल शिंदे (वय 6) आणि मुलगी अंतरा अतुल शिंदे (वय 3)  अशा चौघांचा या प्रकारात मृत्यू झाला आहे. घरामध्ये कोणतीही सुसाईड नोट न मिळाल्याने आत्महत्येमागील कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.

अतुल शिंदे हे आयडेंटीटी कार्ड बनविण्याचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. लॉकडाऊनमुळे त्यांचा व्यवसाय बंद होता. त्यामुळे आर्थिक चणचणीतून उपासमार होत असल्याने नैराश्यातून त्यांनी हे कृत्य केले असावे, अशी परिसरातील नागरिकांमध्ये चर्चा आहे.

गेले दोन दिवस शिंदे यांच्या घरातून कोणतीही हालचाल जाणवली नाही. ते फोन उचलत नसून व्हॉट्सअ‍ॅपवर ऑनलाईनही दिसत नसल्याने त्यांच्या शेजाऱ्यांना शंका आली. त्यांनी त्याबाबत पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी रात्री दहाच्या सुमारास त्यांच्या घरी जाऊन दार तोडून घरात प्रवेश केला असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राहत्या घरी खोलीमध्ये सीलिंग पंख्याच्या हुकला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.

अतूल आणि जया यांचा प्रेमविवाह झाला होता…

अतुल आणि जया यांचा 2013 मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यांच्या लग्नाला दोघांच्या कुटुंबीयांकडून पाठिंबा नव्हता. दरम्यान, मृत्यूपूर्वी दोघांनीही घराच्या भिंतीवर संदेश लिहिला आहे. ‘कृपया पोलिसांनी कोणालाही त्रास देऊ नये. आम्ही आमच्या मर्जीने परिस्थितीला कंटाळून स्वतःला संपवत आहोत’ असे घराच्या भिंतीवर लिहिलेले आढळले. त्याखाली दोघा पती-पत्नीच्या सह्या आहेत.

या प्रकरणी भारती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी पंचनामा करून सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले असून पुढील तपास सुरु आहे. या प्रकाराबद्दल शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button