breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाची डोळेझाक; कोरोनाग्रस्त कामगारालाही बोलावले कामावर!

वायसीएम हॉस्पिटलमधील शवविच्छेदन विभागातील प्रकार

‘त्या’ व्यक्तीच्या संपर्कातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांची पाचावर धारण

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील शवविच्छेदन विभागात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. घरातील व्यक्ती कोरोना बाधित झाल्यानंतर संबंधित व्यक्तीचे कुटुंब क्वारंटाईन करणे गरजेचे असतानाही त्या कर्मचाऱ्याला कामावर बोलावण्यात आले. आता त्या कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे.

रुग्णालयातील शवविच्छेदन विभागात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या वडिलांना मागील काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली. त्यांना उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली तर त्या व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबाला क्वारंटाईन करणे गरजेचे आहे. असे असतानाही महापालिकेने शवविच्छेदन विभागातील त्या कर्मचाऱ्याला कामावर बोलावले. कर्मचाऱ्याने वडिलांची शुश्रूषा करत शवविच्छेदन विभागात काम केले. दरम्यान, त्या कर्मचाऱ्याचा आणि त्याच्या कुटुंबातील अन्य व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कातील त्याचे सहकारी, डॉक्टर, पोलीस, रुग्णांचे नातेवाईक यांची पाचावर धारण बसली आहे.

‘त्या’ कर्मचाऱ्याने वडील कोरोना बाधित असल्याचे कळवले नाही

दरम्यान, शवविच्छेदन विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने त्याच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली असल्याचे प्रशासनाला सांगितले नाही. त्यामुळे तो कर्मचारी कामावर होता, अशी प्रतिक्रिया वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश वाबळे यांनी दिली आहे. एखाद्या कुटुंबातील व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यास बाधित व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींमध्ये लक्षणे आढळून आल्यास त्यांची कोरोना चाचणी केली जाते. शवगृहातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्याच्या इतर सहका-यांची मागणी असेल तर त्यांची कोरोना चाचणी केली जाईल, असेही अधिष्ठाता वाबळे म्हणाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button