Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

एकनाथ शिंदेंची मनधरणी करण्यासाठी शिवसेनेचे नेते सूरतकडे; उद्धव ठाकरेंना यश येणार का?

मुंबईः एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थकांसह सूरत गाठल्यानंतर शिवसेना पक्षात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे हे बंडाच्या तयारीत असताना त्यांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेनेच्या गोटात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेनेचे नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विश्वासू नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांच्यासोबत जवळपास २० ते २५ आमदारांचे समर्थन आहे. तर, काही आमदार मुंबईहून सुरतकडे जाण्यासाठी निघाले असता शिवसैनिकांनी त्यांना अडवले असून त्यांना वर्षा बंगल्यावर नेण्यात आले आहे. वर्षा बंगल्यावर खलबतांना वेग आला असून शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक शिष्टमंडळ सूरतला पाठवले आहे. या शिष्टमंडळावर एकनाथ शिंदे व समर्थक आमदारांची समजूत घालण्याची जबाबदारी असून त्यांना मुंबईत पुन्हा घेऊन येण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

सूरतला गेलेल्या नेत्यांमध्ये मिलिंद नार्वेकर, आमदार रविंद्र फाटक यांची नावं असून ते एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा निरोप ते एकनाथ शिंदे यांच्याकडे पोहोचवणार आहेत. तर, गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांसोबत एकनाथ शिंदे यांच्याशी थेट बोलणं करुन देणार आहेत. तसंच, एकनाथ शिंदे यांच्या मागण्याही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार आहेत. एकनाथ शिंदेंचे मन वळवण्यात हे दोन्ही नेते यशस्वी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शिवेसैनिकांना वर्षावर आणले

एकनाथ शिंदे यांच्या गोटात जाऊ शकणाऱ्या आमदारांना रोखण्यासाठी शिवसेनेकडून वेगवान हालचाली सुरु आहेत. शिंदे यांच्यासोबत जाऊ शकणारे तीन आमदार सेंट रेगिसमध्ये असल्याचे समजताच शिवसैनिक आणि काही आमदार तातडीने याठिकाणी दाखल झाले. त्यानंतर आमदार सुनील शिंदे यांनी या तिन्ही आमदारांना आपल्या गाडीत बसवले. अशा कडेकोट बंदोबस्तामध्ये या तिन्ही आमदारांना वर्षा बंगल्यावरील बैठकीसाठी नेण्यात आले. शिवसेनेच्या सर्व आमदारांना तातडीने वर्षावर बोलवण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button