Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

एकनाथ शिंदे भेटीसाठी आणि चर्चेसाठी तयार; उद्धव ठाकरेंचे २ शिलेदार सुरतकडे रवाना

मुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेच्या गोटातून सगळ्यात मोठी बातमी समोर येतीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक तथा शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांना फोन केला आहे. त्यांच्यामध्ये जवळपास ५ ते १० मिनिटे बातचित झाली आहे. नार्वेकरांशी फोनवर बोलताना एकनाथ शिंदे यांनी चर्चेची तयारी दाखवली आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं झाल्यावर मिलिंद नार्वेकर आणि ठाण्यातील विधान परिषदेचे आमदार, शिंदेंचे अतिशय विश्वासू आणि मर्जीतले रविंद्र फाटक हे सूरतच्या दिशेने रवाना झाले आहेत. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सूरतमध्ये मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक पोहोचतील. त्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करतील. त्यांचं म्हणणं जाणून घेतील. त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर ते तिथूनच मुख्यमंत्र्यांना फोन करुन एकनाथ शिंदे यांचं म्हणणं मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालतील.

राज्यसभेत बसलेल्या धक्क्यानंतर यावेळी शिवसेनेचे सचिन अहिर आणि कट्टर शिवसैनिक आमश्या पाडवी असे दोन्ही उमेदवार विधान परिषद निवडणुकीत विजयी झाले, पण त्या विजयाच्या सेलिब्रेशनाआधीच शिवसेनेत मोठा भूकंप झाला. शिवसेनेमधील क्रमांक दोनचे नेते, धर्मवीर आनंद दिघे यांचे शिष्य, सध्याच्या ठाकरे सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांना घेऊन गुजरातला मध्यरात्री निघून गेले. इकडे सेनेच्या विजयी सेलिब्रेशनची तयारी सुरु असताना एकनाथ शिंदेंच्या बंडांची बातमी समजली आणि शिवसेनेत मोठा भूकंप झाला.

सध्या एकनाथ शिंदे यांच्या बरोबर २० आमदार असल्याची माहिती कळतीये. अशा परिस्थितीत जर शिंदेंनी आपल्या समर्थक आमदारांसहित सरकारमधून बाहेर पडण्याची भूमिका घेतली तर ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ होऊ शकते किंबहुना सरकार कोसळू शकते. पण शिंदे यांच्या पाठीमागे सध्या २० आमदारांचंच बळ आहे. दोन तृतीयांश आमदार दुसऱ्या पक्षात गेले, तर पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. म्हणजेच एकनाथ शिंदे यांना भाजप बरोबर जाण्याच्या निर्णयाआधी किंवा सेनेला धक्का देण्याआधी आणखी १७ आमदारांची गरज आहे. म्हणजेच आमदार शिंदे यांच्या पाठीमागे ३७ आमदारांचं पाठबळ लागेल.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत सध्या २० आमदार आहेत. आम्ही शिवसेनेतच आहोत. परंतु काँग्रेस, राष्ट्रवादीसोबतच सरकार आम्हाला मान्य नाही, अशी त्यांची भूमिका आहे. अशावेळी ठाकरे सरकारमधून बाहेर पडून भाजपसोबत सरकार स्थापन केलं जावं, असा निरोप शिंदे समर्थकांनी शिवसेना नेतृत्वाला दिला आहे. परंतु हा निरोप जर शिवसेना नेतृत्वाने मान्य केला नाही एकनाथ शिंदे वेगळी भूमिका घेऊ शकतात.

अशावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत फक्त २० आमदार असून चालणार नाही तर शिंदेकडे आणखी १७ आमदार असणं आवश्यक आहे तरच ते पक्षांतर बंदीच्या कचाट्याचून वाचू शकतात. सध्या सेनेकडे ५५ आमदार आहेत. दोन तृतीयांश आमदार दुसऱ्या पक्षात गेले, तर पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. म्हणजेच सेनेच्या ३७ आमदारांनी काही वेगळा निर्णय घेतला तर त्यांच्याविरोधात पक्षांतर बंदीचा कायदा लागू होणार नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button