Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

शिवसेना, भाजपमध्ये वादाचे ‘उड्डाण’ होण्याची शक्यता

फडणवीसांना निमंत्रित करण्याची मागणी

मुंबई | बोरिवली येथील एस. व्ही. रोडवरील कोरा केंद्र उड्डाणपुलाचे रखडलेले काम पूर्ण झाले आहे. या पुलाचे उद्घाटन गुरुवारी, १६ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या यांच्या हस्ते करण्याचे निश्चित झाले असल्याचे समजते. या कार्यक्रमास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रित करावे, असा आग्रह भाजपने धरला आहे. मात्र त्यास सेनेने विरोध केला असल्याचे सांगितले जाते आहे. फडणवीस यांना या कार्यक्रमाला न बोलावल्यास शिवसेना, भाजपमध्ये मोठा वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एस. व्ही. रोडवर होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी व वाहनचालकांचा वेळ वाचवण्यासाठी पालिकेने बोरिवली पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलाला लागून एस. व्ही. रोडला ओलांडणारा दुसरा उड्डाणपूल बांधला आहे. हा उड्डाणपूल थेट चिकूवाडी येथील कल्पना चावला चौक येथे उतरवण्यात आला आहे. ९९३ मीटर लांब आणि ५६ मीटर रुंद असलेल्या या पुलासाठी ११३ कोटींहून अधिक रुपये खर्च करण्यात आले आहेत. उड्डाणपुलाच्या कामाला नोव्हेंबर २०१८मध्ये सुरुवात झाली होती. हे काम २४ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन होते. त्यामुळे नोव्हेंबर २०२०मध्ये या पुलावरून वाहतूक सुरू व्हायला हवी होती. मात्र करोना आणि कामे वाढल्यामुळे पुलाचे काम रखडले होते.

पुलाचे काम पूर्ण झाले असून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन व्हावे, अशी इच्छा या भागातील शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे. मात्र मुख्यमंत्र्यांची तारीख निश्चित होत नसल्याने उद्घाटन रखडले आहे. दरम्यान, या पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रित करावे, असा आग्रह भाजपने धरला आहे. ‘खासदार गोपाळ शेट्टी यांनी या पुलाचा प्रस्ताव पालिकेत मांडला होता. तसेच शेट्टी यांनी ५ मे २०२२ रोजी आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात या पुलाचे लोकार्पण उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. मात्र आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, अद्याप फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. राजशिष्टाचारानुसार विरोधी पक्षनेत्यांना आमंत्रित करावे’, अशी मागणी भाजपचे उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष गणेश खणकर यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

बिपीन रावत यांचे नाव द्यावे

हा पूल तातडीने सुरू करावा, यासाठी सोमवारी बोरिवली व कांदिवली विभागातील भाजप नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष गणेश खणकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप गटनेते प्रभाकर शिंदे व प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांची भेट घेतली. पूल लवकर खुला झाल्यास येणाऱ्या पावसाळ्यात नागरिकांना वाहतूककोंडीतून दिलासा मिळेल, अशी मागणी करण्यात आली आहे. पुलाला दिवंगत सीडीएस प्रमुख जनरल बिपीन रावत यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी खासदार गोपाळ शेट्टी यांनी पालिकेकडे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button