शर्जिल उस्मानी मोकाट अन् नारायण राणे यांना अटक; हेच का नवे हिंदुत्व : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
मुंबई । प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल अटक करण्यात आली. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरील कारवाई ही सूडबुद्धीने केलेली आहे. पोलीस यंत्रणेचा दुरूपयोग करीत होत असलेल्या या दडपशाहीचा मी तीव्र निषेध करतो. शर्जिल उस्मानी मोकाट आणि नारायण राणे यांना अटक… हे आहे नवे हिंदूत्व आणि असा आहे नवा महाराष्ट्र… अशा शब्दांत फडणवीस यांनी टिका केली आहे.
केंद्रीय मंत्री श्री नारायणराव राणे यांच्यावरील कारवाई ही सूडबुद्धीने केलेली आहे.
पोलिस यंत्रणेचा दुरूपयोग करीत होत असलेल्या या दडपशाहीचा मी तीव्र निषेध करतो.
शर्जिल उस्मानी मोकाट आणि
नारायण राणे यांना अटक!हे आहे नवे हिंदूत्त्व आणि
असा आहे नवा महाराष्ट्र !!!#NarayanRane— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 24, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेलं विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भोवलं आहे. नारायण राणे यांना या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या कारवाईपूर्वी रत्नागिरी सत्र न्यायालयाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. मात्र हा अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
तिथेही योग्य ती प्रक्रिया पार पाडून याचिका करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नारायण राणे यांच्या वकिलांना दिले होते. त्यामुळे तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. त्यानंतर नारायण राणेंच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला होता. सध्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. नारायण राणे यांना त्यांच्याच गाडीत बसवून पोलीस रवाना झाले आहेत. यावेळी नितेश राणे आणि समर्थकांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांचा मोठा फौजफाटा तिथे तैनात होता. पोलीस नारायण राणेंना घेऊन रवाना झाले आहेत.