ताज्या घडामोडीमुंबई

विसरभोळय़ा प्रवाशांकडून सात हजार २२५ तक्रारी

लॅपटॉप, दागिन्यांचा विसर, लोहमार्ग पोलिसांच्या हेल्पलाइनवर तक्रारी

मुंबई : रेल्वे प्रवासात अनेकदा घाईत उतरणारे प्रवासी आपल्याजवळील मौल्यवान वस्तू लोकल किंवा एक्स्प्रेसमध्येच विसरून जातात. अशा विसरभोळय़ा प्रवाशांनी वस्तू गहाळ झाल्याच्या किंवा त्या विसरल्याच्या २०२० आणि २०२१ मध्ये सात हजार २२५ तक्रारी लोहमार्ग पोलिसांच्या १५१२ हेल्पलाइनवर केल्या आहेत. संबंधितांना या वस्तू सापडण्याचे प्रमाण मात्र अत्यंत कमी आहे. आजतागायत यापैकी केवळ दोन हजार ८३७ वस्तू सापडल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांकडून देण्यात आली. रेल्वे प्रवाशांच्या मदतीसाठी १५१२ हेल्पलाइन कार्यरत आहे. प्रवासात एखादी वस्तू हरविणे, विसरणे याशिवाय लोकलमधील महिला आणि अपंगांच्या राखीव डब्यात घुसखोरी, विनयभंग, छेडछाड, फेरीवाला, भिकारी, दारू पिऊन प्रवास करणारे इत्यादींविषयी तक्रारी या हेल्पलाइनवर होत असतात. त्यामध्ये वस्तू विसरणे, गहाळ झाल्याच्या तक्रारीही लक्षणीय असतात. लोहमार्ग पोलिसांकडून तक्रारीची दखल घेऊन सगळी यंत्रणा कामाला लावली जाते आणि ती वस्तू प्रवाशाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात.

या हेल्पलाइनवर २०२० मध्ये वस्तू विसरणे, गहाळ झाल्याच्या तीन हजार ७९६ तर २०२१ मध्ये तीन हजार ४२९ अशा एकूण सात हजार २२५ तक्रारी लोहमार्ग पोलिसांना प्राप्त झाल्या. यात प्रवासामध्ये एकूण ४६० तक्रारी मोबाइल हरवल्याच्या आहेत. त्यातील १०० मोबाइल परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले आहे. तर सोन्याचे दागिने गहाळ झाल्याच्याही ६४१ तक्रारी करण्यात आल्या असून फक्त ३३ तक्रारींमध्येच सोन्याचे दागिने परत करण्यात यश आले आहे. उर्वरित तक्रारींमध्ये सोन्याचे दागिने सापडलेले नाहीत. याशिवाय प्रवासादरम्यान ४२५ टॅब, लॅपटॉप हरविले असून फक्त पाच टॅब आणि १२९ लॅपटॉप प्रवाशांना परत करण्यात आले आहेत. अन्य तक्रारींमध्ये रोख रक्कम, कुणी खरेदी केलेले सामान, तर कुणाची कार्यालयीन बॅग, तसेच महत्त्वाच्या कागदपत्रांची पिशवी इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. अशा पाच हजार ६९९ तक्रारी असून माहिती हेल्पलाइनद्वारे मिळताच लोहमार्ग पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जातो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

महागडय़ा वस्तूंचा समावेश

लोहमार्ग पोलिसांनी केलेल्या तपासात दोन हजार ८३७ वस्तू सापडल्या. २०२० मध्ये सापडलेल्या वस्तूंची किंमत ७० लाख २९ हजार २४ रुपये आणि २०२१ मध्ये एक कोटी १७ लाख ५५ हजार १२३ रुपये आहे. यामध्ये सोन्याचे दागिने, लॅपटॉप, टॅब यासह अन्य महागडय़ा वस्तूंचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button