breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

ज्येष्ठ विचारवंत डॉ. गेल ऑम्व्हेट ऊर्फ शलाका पाटणकर यांचे निधन

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ, श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या, संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. गेल ऑम्व्हेट ऊर्फ शलाका पाटणकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या. ज्येष्ठ विचारवंत आणि कष्टकऱ्यांचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या त्या पत्नी होत.

गुरुवारी (ता. २६) सकाळी १० वा. कासेगाव (जि. सांगली) येथे क्रांतिवीर बाबूजी पाटणकर संस्थेच्या आवारामध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात पती डॉ. भारत पाटणकर, मुलगी प्राची , जावई तेजस्वी, नात निया आहेत. प्राची आणि त्यांचे कुटुंबीय हे सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहेत.

गेल्या काही दिवसांपासून डॉ. गेल आजारी होत्या. लॉकडाऊननंतर त्यांना चालता येत नसल्यामुळे कासेगाव येथे घरीच डॉ. भारत पाटणकर यांच्या देखरेखेखाली वैद्यकीय उपचार घेत होत्या. बुधवारी डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे निधन झाले.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच धरणग्रस्त चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने कासेगाव येथे जमा झाले. अनेकांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले.

मूळ अमेरिकन; पण झाल्या भारतीय
डॉ. गेल या मूळच्या अमेरिकेच्या असल्या तरी त्या तेथे विध्यार्थीदशेपासूनच वेगवेगळ्या चळवळीमध्ये सक्रीय होत्या. अमेरिकेच्या साम्राज्यवादी युद्धखोर प्रवृत्तीविरोधी उभा राहिलेल्या तरुणाईच्या चळवळीत त्या अग्रस्थानी होत्या.अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर त्या भारतात आल्या. वेगवेगळ्या चळवळींचा अभ्यास करत असताना त्या महाराष्ट्रात आल्या. महात्मा फुले यांनी केलेल्या संघर्षाला आपलेसे केले.

पुढे महात्मा फुले यांच्या चळवळीवरच त्यांनी ‘वसाहतिक समाजातील सांस्कृतिक बंड’ (नॉन ब्राम्हीण मूहमेन्ट इन वेस्टर्न इंडिया ) हा आपला पीएचडी प्रबंध अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बरकली विद्यापीठात सादर केला. त्या विषयात डॉक्टरेट पदवी संपादन केली, त्यांच्या पूर्वी महात्मा फुले यांच्या चळवळीवर भारतातील कोणीही इतका सविस्तर अभ्यास करून, महाराष्ट्रभर फिरून मांडणी केली नव्हती.त्यांचा हा प्रबंध भारतातच नव्हे तर जगभरात अभ्यासकांसाठी महत्त्वाचा मानला जातो. त्यांच्या या पुस्तकामुळे महात्मा फुले यांची चळवळ पुन्हा नव्याने अधोरेखित झाली.

या पुस्तकामुळे बहुजन समाज पार्टीचे संस्थापक दिवंगत कांशीराम कासेगाव येथे येऊन त्यांचे मार्गदर्शन व सल्ला घेत असत.डॉ. गेल ऑम्व्हेट या मूळच्या अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रातील. मात्र, त्यांनी भारतात विशेषतः महाराष्ट्रात राहण्याचा निर्णय घेतला. स्री-मुक्ती चळवळींचा अभ्यास करत असतानाच इंदूताई पाटणकर यांची भेट झाली.एम.डी चे शिक्षण अर्धवट सोडून पूर्णवेळ चळवळीत काम करणाऱ्या डॉ. भारत पाटणकर यांच्याशी त्यांचा परिचय झाल्यानंतर त्यांच्याशी त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला.त्यानंतर त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व सोडून भारतीय नागरिकत्व स्वीकारले. डॉ. गेल आणि डॉ. भारत यांनी जोडीने अनेक सामाजिक लढाया लढल्या.

बौद्धिक मार्गदर्शक
अफाट वाचनशक्ती, आणि पायाला भिंगरी बांधून फिरण्याची वृत्ती यामुळे डॉ. गेल या संपूर्ण भारतभर फिरत आणि लिहीत राहिल्या.वेगवेगळ्या चळवळीत त्यांनी पुढाकार घेतला. पश्चिम महाराष्ट्रात क्रांतिवीरांगना इंदूताई यांच्या पुढाकाराने परित्यक्ता स्त्रियांच्या चाललेल्या चळवळीचे त्यांनी नेतृत्व केले.तत्कालीन खानापूर तालुक्यामध्ये मुक्ती संघर्ष चळवळीच्या वतीने दुष्काळ निर्मूलन चळवळ, दुष्काळ निर्मूलनासाठी बळीराजा धरणाची निर्मिती यासाठी झालेल्या संघर्षात त्यांचा पुढाकार होता.

विविध विद्यापीठांमध्ये अध्यापन
डॉ. गेल यांनी देशभरातील विविध विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पुणे विद्यापीठात फुले- आंबेडकर अध्यासनाच्या प्रमुख, समाजशास्त्र विभागाच्या प्राध्यापक हाेत्या.ओरिसामधील निस्वासमध्ये आंबेडकर अध्यासनाच्या प्रोफेसर, नोर्डीक येथे आशियाई अतिथी प्राध्यापक, इन्स्टिट्यूट ऑफ एशियन स्टडीज कोपनहेगन, नेहरू मेमोरिअल म्युझियम आणि लायब्ररी नवी दिल्ली, सिमला इन्स्टिट्यूट मध्ये प्रोफेसर म्हणून काम केले आहे. एफएओ, यूएनयूपी, एनओव्हीआयबी च्या सल्लागार होत्या. आयसीएसएसआरच्यावतीने त्यांनी ‘भक्ती’ या विषयावर संशोधन केले आहे.

२५ पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित
डॉ. गेल यांची २५ पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित असून त्यामध्ये प्रामुख्याने ‘कल्चरल रिवोल्ट इन कोलोनियल सोसायटी- द नॉन ब्राम्हीण मुहमेन्ट इन वेस्टर्न इंडिया’, ‘सिकिंग बेगमपुरा’, ‘बुद्धिझम इन इंडिया’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘महात्मा जोतीबा फुले’, ‘दलित अँड द डेमॉक्रॅटिक रिव्ह्यूलेशन’, ‘अंडरस्टँडिंग कास्ट’, ‘वुई विल स्मॅश दी प्रिझन’, ‘न्यू सोशल मुमेन्ट इन इंडिया’ अशी त्यांची ग्रंथसंपदा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button