breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारणलेख

स्वाभिमानी भूमिपूत्र काळाच्या पडद्याआड! : आमदार महेश लांडगे

पिंपरी-चिंचवड शहराच्या वाटचालीतील ‘‘लखलखता तारा’’ म्हणून ज्यांची ओळख अजरामर राहील, असे शहराचे नेते आदरणीय लक्ष्मण जगताप यांनी जगाचा निरोप घेतला. पिंपरी-चिंचवडच्या या स्वाभिमानी सुपूत्राची कारकीर्द पिढ्यानपिढ्या स्मरणात राहणार आहे.

राजकारण करत असताना तत्वाशी नेहमी एकनिष्ठ राहायचे.आपला स्वाभिमान, बाणेदारपणा कायम राखायचा हे आदर्शवत राजकारण भाजपाचे माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी कायम जपले आणि आम्हा नवोदितांना शिकवले. ज्यावेळी पिंपरी-चिंचवडकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न पुढे आला त्यावेळी त्यांनी पक्ष, राजकारण देखील झुगारले. अशा कर्तुत्व संपन्न आणि धगधगत्या नेतृत्वाला पिंपरी-चिंचवड शहर आज मुकले आहे.

सुमारे ३५ वर्षे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणावर आमदार जगताप यांनी एक वेगळा दबदबा निर्माण केला. गेल्या २० वर्षात शहराच्या निर्णय प्रक्रियेत त्याचा ‘शब्द’ म्हणजे प्रमाण होता. पिंपरी-चिंचवडमधील सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला अनधिकृत बांधकाम, शास्तीकर, प्राधिकरणाचा परतावा अशा मुद्यांवर आमदार जगताप यांनी तत्कालीन मातब्बर पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. कारण, शहरातील प्रश्न सुटत नसतील, तर अशा राजकारणाचा उपयोग काय? अशी सडेतोड भूमिका घेणारे आमदार जगताप २०१४ पासून भारतीय जनता पार्टीचे ‘डिसिझन मेकर’ नेते बनले होते.

मी पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर सभागृहात कामकाज कसे करावे? विषय कसे मांडावे? लक्षवेधी कशी द्यावी? यांसारख्या छोट्या-छोट्या गोष्टी देखील त्यांनी शिकवल्या आहेत. आजाराशी झुंज सुरू असताना विधान परिषद आणि त्यानंतर राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी आमदार जगताप रुग्णवाहिकेतून मुंबई येथील विधान भवनात दाखल झाले आणि आपला मतदानाचा हक्क बजावला. ‘‘राष्ट्र प्रथम.. नंतर पक्ष आणि शेवटी मी…’’ हे भारतीय जनता पार्टीचे ब्रिद आमदार जगताप यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जपले. संपूर्ण राज्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांना प्रेरणा राहील, असे कार्य उभा करणारे आमदार जगताप माझ्यासारख्या असंख्य भाजपा कार्यकर्त्यांचे आदरस्थान आहेत.

निवडणुकीच्या काळात आमदार जगताप आणि मी म्हणजे भाजपाची ‘राम-लक्ष्मण’ची जोडी अशी घोषणा शहरात खूप लोकप्रिय झाली. पक्ष संघटनामध्ये भाऊंचा नेहमी आधार वाटत होता. आता हा ‘आधार’ हरपला आहे. पिंपरी-चिंचवडकरांच्या स्वाभिमानासाठी राजकीय लढा उभारणारा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. ही पोकळी कधिही भरुन येणारी नाही. असा कर्तुत्वसंपन्न नेता पुन्हा होणे नाही.

पिंपरी-चिंचवडच्या ढाण्या वाघाला भावपूर्ण श्रद्धांजली..!

महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button