breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्राधिकरण हद्दीत राहणाऱ्या नागरिकांच्या नावावर जागेचा सातबारा करा – रवि लांडगे

पिंपरी – प्राधिकरण जागेवर वर्षांनुवर्षांपासून घर बांधून राहणाऱ्या नागरिकांच्या नावावर संबंधित जागा व्हावी, यासाठी नगरसेवक रवि लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे घातले आहे.

हे नागरिक पिंपरी-चिंचवड महापालिकेला प्रत्येक प्रकारचा कर देत आहेत. तरीही कागदोपत्री या जागांवर प्राधिकरणाचा शिक्का मारलेला आहे. हा सरकारी शिक्का कायमचा पुसून जनहिताचा निर्णय घेण्याची धमक फक्त तुमच्यातच आहे. त्यामुळे भोसरीतील धावडेवस्ती, भगतवस्तीसह पिंपरी-चिंचवडच्या अन्य भागात प्राधिकरणाच्या जागेवर घरे बांधून राहणाऱ्या संबंधित नागरिकांच्या नावावरच त्या जागेचा सातबारा करा, अशी मागणी नगरसेवक रवि लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा प्रश्न समजावून घेत तो कायमचा मार्गी लावण्याबाबत लवकर धोरणात्मक निर्णय घेण्याची ग्वाही नगरसेवक लांडगे यांना दिली आहे. नगरसेवक लांडगे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांची पुण्यात भेट घेत मागणीचे निवेदन दिले. या वेळी नगरसेवक अजित गव्हाणे आणि सामाजिक कार्यकर्ते संजय उदावंत उपस्थित होते.

यासंदर्भात नगरसेवक रवि लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण नुकतेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) विलीन झाले आहे. त्यामुळे प्राधिकरण 50 वर्षांनंतर विसर्जित झाले.

विलीनीकरणानंतर प्राधिकरणाच्या सर्व चल, अचल, मालमत्ता, दायित्वे, कार्यालये, व्यापारी इमारती, ठेवी आणि इतर गुंतवणूक पीएमआरडीएकडे हस्तांतरीत केली जाणार आहेत. तर प्राधिकरणाने विकसित करुन दिलेले भूखंड, आरक्षित व अतिक्रमण झालेल्या भूखडांची मालकी किंवा ताबा पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे राहणार आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मोठी औद्योगिक वसाहत आहे. या वसाहतीतील विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कित्येक कष्टकऱ्यांनी प्राधिकरणाच्या हद्दीतील एक, दीड किंवा दोन गुंठा जमीनी घेतल्या. त्यावर स्वतःच्या स्वप्नातील घरे बांधून ते वास्तव्य करत आहेत. शहरात पोटापाण्यासाठी आलेले हे कष्टकरी राज्याच्या कानाकोपऱ्यातील आहेत.

या कष्टकऱ्यांनी पोटाला चिमटा काढून पै-पै जमवून या जागांवर घरे बांधून राहत आहेत. परंतु, त्यावर प्राधिकरणाच्या जागेतील अतिक्रमण असा शिक्का बसलेला आहे. या कष्टकऱ्यांनी प्राधिकरणाच्या जागेवर घरे बांधली असली तरी ते पिंपरी-चिंचवड महापालिकेला सर्व प्रकारचा कर देत आहेत. आतापर्यंत महापालिकेला कित्येक कोटींचा कर भरलेला आहे. प्राधिकरणाचा शिक्का असलेली ही जागा संबंधित कष्टकरी नागरिकांच्या नावावर व्हावी आणि हा प्रश्न कायमचा सुटावा यासाठी माझे वडील महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते कै. बाबासाहेब लांडगे आणि माझे चुलते महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते कै. ॲड. अंकुशराव लांडगे यांनी जनआंदोलन उभारले होते. तोच वसा आणि वारसा मी चालवत असून, माझ्या शहरात प्राधिकरणाच्या जागेवर राहणाऱ्या कष्टकरी गोरगरीब जनतेचा त्या जागांवर कायदेशीर हक्क प्राप्त व्हावा यासाठी मीही प्रयत्नशील आहे.

आता प्राधिकरणाच्या हद्दीतील घरांच्या भूखंडाची मालकी किंवा ताबा पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे असणार आहे. दादा, या नागरिकांच्या घरावर असणारा प्राधिकरणाचा शिक्का कायमचा पुसण्याची धमक फक्त आपल्यासारख्या नेत्यामध्येच आहे. अनेक वर्षे प्रलंबित असलेला शहरातील शेकडो कष्टकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न आपल्यासारख्या पिंपरी-चिंचवडच्या शिल्पकराच्या हातानेच मार्गी लागू शकतो, असा मला ठाम विश्वास आहे.

त्यामुळे प्राधिकरणाच्या हद्दीतील जागांचा सातबारा त्या-त्या कष्टकऱ्यांच्या नावावर करण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन त्या जागेवरील घरे नाममात्र दर आकारून नियमित करण्यात यावीत. त्याबाबत महापालिका प्रशासनाला निर्देश देण्याची कार्यवाही राज्य सरकारकडून व्हावी. वर्षांनुवर्षे प्रलंबित असलेल्या या प्रश्नाबाबत आपण पुढाकार घेऊन लवकर जनहिताचा निर्णय घ्यावा, ” अशी मागणी त्यांनी केली आहे.
निवेदन स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी नगरसेवक रवि लांडगे यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. प्रश्न निश्चितपणे सुटण्यासारखा आहे. हा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी सरकार पातळीवर योग्य तो निर्णय नक्की घेऊ, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button