breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

ग्राऊंड रिपोर्ट : ‘मावळ’ साठी संजोग वाघेरे यांनी फुंकले रणशिंग!

वाढदिवसानिमित्त पोस्टरबाजी : मावळच्या मनातील खासदाराचा उल्लेख

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

मावळ लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पिंपरी-चिंचवडचे माजी शहराध्यक्ष, महापालिकेचे माजी महापौर संजोग वाघेरे यांनी रणशिंग फुंकले आहे. वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांनी शहरभर पोस्टरबाजी केली आहे. त्यामध्ये ‘‘मावळच्या मनातला खासदार’’ असा उल्लेख करत लोकसभेला ते इच्छुक असल्याचा संदेश दिला आहे. या मतदारसंघात जागा वाटपाचा तिढा सुटून वाघेरे यांना उमेदवारी मिळणार की नेहमीप्रमाणे आपली तलवार म्यान करावी लागणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

संजोग वाघेरे यांनी अडचणीच्या काळात शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. विविध घटकातील नागरिकांना पक्षातील पदांवर जबाबदारी देऊन पक्षात देखील समन्वय साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सातत्याने आंदोलन, निवेदने देऊन पक्षाची भूमिका मांडत होते. विविध उपक्रमांमुळे पदाधिकाऱ्यांना देखील उत्साह भेटत होता. वाघेरे हे राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू आहेत. पिंपरी गावासह शहरात त्यांचे मोठे राजकीय वलय आहे. मात्र सध्या वाघेरे हे एका मोठ्या राजकीय संधीच्या शोधात आहेत. मात्र अद्याप तरी त्यांना ती संधी गवसली नसल्याचे चित्र आहे.

मावळ लोकसभेसाठी राष्ट्रवादी प्रत्येक निवडणुकीत उमेदवारीच्या शोधात असते. अनेकदा बाहेरून उमेदवार आयात करण्याची वेळ पक्षावर आली आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारीची ही कमतरता भासू नये यासाठी संजोग वाघेरे यांनी सातत्याने लोकसभेसाठी आपला दावा सांगितला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत पार्थ पवार यांच्यासाठी त्यांनी आपली सुप्त इच्छा दाबून ठेवली आहे. शहरात राजकीय मवाळ भूमिका घेतल्याने मावळ लोकसभेसाठी चिंचवड विधानसभेतून विरोधकांचीही मदत होईल असे त्यांचे राजकीय गणित आहे. इतर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे मित्र पक्ष मदत करतील असा आराखडा वाघेरे यांचा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघासाठी सातत्याने ते आपला हक्क सांगत आहेत. मधल्या काळात त्यांनी शांत भूमिका घेतली होती. मात्र आता वाढदिवसाचे निमित्त करून समर्थकांनी पुन्हा मावळ लोकसभेच्या स्पर्धेत आणून ठेवले आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि युतीतील सत्ताधारी काय भूमिका घेतात या वर वाघेरे यांचे भवितव्य ठरणार आहे.

हेही वाचा – ‘भाजपने तीन वेळा राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला’; सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्यस्फोट

पार्थ पवारांचे काय ?

मावळ लोकसभेतून गतवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार उमेदवार होते. त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांचे या मतदारसंघाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. मात्र आपल्या समर्थकांकरवी त्यांच्या हालचाली सुरु असल्याचेही अधे मध्ये दिसत आहे. त्यामुळे ते लोकसभेसाठी निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा उतरणार आहेत की नाही या बाबत पदाधिकारी, कार्यकर्ते संभ्रमात आहेत. त्यांची नेमकी भूमिका स्पष्ट होत नसल्याने कदाचित वाघेरे यांनी उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे सांगून अप्रत्यक्ष त्यांना सतर्क करण्याचा प्रयत्न केला आहे. पार्थ पवारांची तरीही भूमिका उघड न झाल्यास संजोग वाघेरे मोठ्या ताकदीने दावा करण्याची शक्यता आहे.

उमेदवारी न दिल्यास नाराजीची शक्यता ?

सध्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडली आहे. खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अशा दोन गटात विभागणी झाली आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी राजकीय स्पेस निर्माण झाली आहे. अशा मधेच विविध निवडणुकांमध्ये राजकीय उमेदवारीसाठी कोलांटउड्या पाहायला मिळतील हे मात्र नक्की. त्याला अनुसरूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मावळसाठी उमेदवारी न दिल्यास संजोग वाघेरे खा. शरद पवार यांच्या साथीला जाऊन त्यांच्या गटाकडून उमेदवारी घेतील का, हे पाहावे लागणार आहे. खा. पवार आणि संजोग वाघेरे यांचे राजकीय संबंध शहराला परिचित आहेच. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवारीची रंगत वाढली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button