ताज्या घडामोडीमुंबई

संजय पांडे निवृत्तीनंतर शिवसेनेचा भगवा हाती घेणार; चंद्रकांत पाटलांची मिश्किल टिप्पणी

मुंबई| गेल्या काही दिवसांपासून मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे हे निवृत्तीनंतर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. याविषयी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. संजय पांडे  हे शिवसेनेत जाणार आहेत किंवा नाही, हे मला माहिती नाही. पण सरकारी नोकरीतून बाहेर पडल्यानंतर आलेला थकवा, कंटाळा आणि चिडचिड संपवण्यासाठी ते एखादे सामाजिक किंवा राजकीय काम करण्याची इच्छा दाखवत असतील ती चांगली गोष्ट आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याची केंद्रीय गृहमंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे. मुंबई पोलिसांनी हल्ल्याच्यावेळी सीआयएसएफचे जवान कुठे होते, असा उलट प्रश्न केंद्रीय यंत्रणेला विचारला आहे. मात्र, मला याबाबत काहीही बोलायचे नाही. या सगळ्या यंत्रणा असतानाही किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला कसा झाला, हा खरा प्रश्न असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

तसेच किरीट सोमय्या यांना झालेली जखम लहान किंवा मोठी आहे, हे महत्त्वाचे नाही. जखम किरकोळ आहे किंवा मोठी यावर कलम ठरत नाही. जीवे मारण्याचा प्रयत्न झाला की ३०७ हे कलम लागलेच पाहिजे. उद्या एखाद्याने रायफलने हल्ला केला आणि छोटी जखम झाली तर मग तो गुन्हा ठरणार नाही का? त्यामुळे या प्रकरणात हल्लेखोरांवर ३०७ कल लागलेच पाहिजे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.

संजय पांडे यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना उधाण

संजय पांडे यांच्या निवृत्तीला अवघे काही महिने बाकी आहेत. संजय पांडे हे महाविकास आघाडी सरकारच्या मर्जीतील असल्यामुळेच त्यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नेमणूक झाल्याची चर्चा होती. यापूर्वीचे आयुक्त हेमंत नगराळे हे भाजप नेत्यांवर कारवाई करण्यात तत्परता दाखवत नव्हते. त्यामुळे त्यांची उचलबांगडी करून महाविकास आघाडीने संजय पांडे यांना आयुक्तपदी आणल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

संजय पांडे यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाचा कारभार स्वीकारल्यापासून भाजप नेत्यांवरील कारवाईला वेग आल्याचे चित्र आहे. आतापर्यंत प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या, नील सोमय्या यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. संजय पांडे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप विरोधक सातत्याने करतात. त्यामुळेच संजय पांडे निवृत्तीनंतर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना संजय पांडे यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात पूनम महाजन यांच्याविरोधात मैदानात उतरवू शकते, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button