ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

सांगली: ऐतवडे बुद्रुकला विकासाचे ‘रोल मॉडेल’ बनविण्याचा संकल्प!

सरपंच सुभाष कुंभार यांचा निर्धार : सुसज्ज रस्ते, केबीपी महाविद्यालयाच्या इमारतीचा ‘मेकओव्हर’

सांगली: सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुकमध्ये प्रवेश करताना झाडांची गार सावली अनुभवयाला मिळणार आहे. या ठिकाणी सुसज्ज रस्ता निर्माण करताना रस्त्याच्या मधोमध झाडे लावण्यात येणार आहेत. याबरोबरच गावातील जीर्ण झालेल्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या इमारत डागडुजीसाठी देखील प्रयत्न केले जाणार आहेत. या कामांसह लाखो रुपयांची कामे विविध फंडातून करण्यात येणार असून, विकासाचे ‘रोल मॉडेल’ तयार करण्याचा निर्धार (व्हिजन) ऐतवडे बुद्रुक गावचे सरपंच सुभाष कुंभार यांनी केला आहे.

गावचे नवनियुक्त सरपंच सुभाष कुंभार यांच्याशी ‘महाईन्यूज’ च्या वतीने संपर्क साधत गावच्या विकासाचे ‘व्हिजन’ जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्यांनी संवाद साधताना गावात कोणत्या कामांचे नियोजन आहे त्याचा आराखडा मांडला.

कुंभार म्हणाले की, लाडेगाव वरून ऐतवडे बुद्रुक मध्ये प्रवेश करताना सुसज्ज आणि सावली देणारे रस्ते अनुभवायला मिळणार आहेत. मराठी मुलांची शाळा ते ऐतवडे बुद्रुक फाटा (कावखडी) दरम्यान येण्यासाठी आणि जाण्यासाठी दुहेरी रस्ता करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी आमदार, खासदार आदी लोकप्रतिनिधींकडे निधीसाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. रस्ता तयार करताना रस्ताच्या मधोमध फळे देणारी झाडे देखील लावण्याचे नियोजन आहे.

जंगली शोभेची झाडे न लावता जांभूळ, चिंच आणि आवळाचे झाड लावण्यात येणार आहे. जेणेकरून या रस्त्यावरून ये जा करताना नागरिकांना फळे खाता येणार आहेत. तसेच सावली देखील मिळणार आहे. या कामाबरोबरच गावात असणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात पंचक्रोशीतील गावातील गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. ज्ञानात भर घालणाऱ्या या महाविद्यालयाची इमारत सध्या जीर्ण झाली आहे. त्याच्या डागडुजीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांची भेट घेऊन ५० लाख रुपये निधी देण्यासाठी विनंती केली आहे. खा. पवारांनी देखील त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे कुंभार म्हणाले. निधी मिळाल्यानंतर तात्काळ कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

नवीन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न…

गावात कर्मवीर भाऊराव पाटील यांचे मोठे स्मारक करण्यासाठी संस्थेच्या वतीने प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी १ एकर जागेची मागणी केली आहे. संबधित नियोजित जागेची स्वच्छता ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच संस्थेच्या वतीने स्मारक करत असताना आवश्यक त्या मदतीसाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे कुंभार म्हणाले. या बरोबरच गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय टाळण्यासाठी पाण्याचे एटीएम सुरु करण्याचा अभिनव उपक्रम नुकताच राबविण्यात आला. ग्रामपंचायत मधील सहकाऱ्यांच्या सोबतीने त्याचे नुकतेच उदघाटन देखील करण्यात आले आहे. या सर्व कामांसोबत आणखी नवीन उपक्रम गावात राबविण्याचा मानस असल्याचे सरपंच सुभाष कुंभार यांनी सांगितले.

‘तेंडल्या’तील कलावंतांचा सत्कार…

दरम्यान, ऐतवडे बुद्रुक गावातील बाल कलाकार ओंकार गायकवाड व दिग्विजय काळगावे यांचा समावेश असणाऱ्या ‘तेंडल्या’ या चित्रपटाचे गावातील यात्रेनिमित्त असणाऱ्या कलापथक कार्यक्रमावेळी प्रमोशन करण्यात आले. हा चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली व चित्रपटाच्या उतुंग यशाबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच, गावतील या बालकलाकारांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी सरपंच सुभाष कुंभार, तंटामुक्ती अध्यक्ष प्रवीण गायकवाड, कुस्ती कमिटीचे प्रवीण वंडकर, यात्रा कमिटीचे किरण कदम, प्रकाश गायकवाड व इतर उपस्तिथ होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button