breaking-newsताज्या घडामोडीपुणे

आळंदीतील सर्व वारकरी शिक्षण संस्थांची चौकशी करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

अल्पवयीन मुलांवर लैगिक अत्याचार प्रकरण : बाल हक्क आयोगाकडे केली तक्रार

पुणे : आळंदीतून नुकतीच एक खळबळजनक घटना उघडकीस आली होती,एका वारकरी शिक्षण संस्थेतील संस्थाचालकाने तीन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी संस्थाचालक महाराजाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अटक करण्यात आली आहे.तसेच त्या महाराजाची वारकरी शिक्षण संस्था हि बेकायदा असल्याचे निष्पन्न झाले आहे. तरी आळंदीतील सर्व वारकरी शिक्षण संस्थांची चौकशी करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्य बाल हक्क संरक्षण आयोग महाराष्ट्र राज्य, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त,तसेच महिला व बाल कल्याण विभाग पुणे, धर्मादाय आयुक्त पुणे यांना निवेदणाद्वारे करण्यात आली आहे.

आळंदी क्षेत्रामध्ये शेकडो कीर्तनकार महाराज मंडळींकडून वारकरी शिक्षण संस्थेच्या नावाखाली अनेक अल्पवयीन शालेय विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य पद्धतीने पैसे घेऊन,उत्पन्नाचे साधन म्हणून वसतीगृह चालविली जात आहेत.हे वारकरी विद्यार्थी वस्तीगृह चालवताना शासनाच्या नियम व अटी पाळल्या जात नाहीत.अल्पवयीन मुलांची अनेक मार्गाने मोठ्या प्रमाणात पिळणूक करण्यात येते. जसे की,आर्थिक मोबदला घेऊन विविध प्रकारच्या मिरवणुकीत भर उन्हामध्ये चिमुकल्या निष्पाप जिवांना फिरविले जाते,सप्ताहाच्या कीर्तनात तासोन-तास टाळ मृदुंग घेऊन उभे करण्यात येते, गावोगावी मिरवणूकीसाठी पाठविले जाते.त्याचबरोबर भोजनाचा खर्च वाचावा म्हणून आळंदीत वेगवेगळ्या सप्ताहाच्या पंक्तीत,लग्नाच्या पंक्तीत त्या लहान मुलांना वारकरी वेश परिधान करून भोजनाकरिता घुसविले जाते.

हेही वाचा – ‘पंतप्रधान मोदी ओबीसी असल्याचा दावा खोटा’; राहुल गांधींचा आरोप

दरम्यान, यापूर्वी देखील आळंदीत अशाप्रकारे वारकरी संस्थेत राहणाऱ्या अनेक निष्पाप बालकांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटना उघडकीस आलेल्या आहेत.सातत्याने घडत असलेल्या या घटनांमुळे आळंदी परिसरात तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.अलीकडच्या काळात पालकांनी केलेल्या तक्रारीवरून आळंदी पोलीस स्टेशनमध्ये वारकरी शिक्षण संस्थेच्या संस्थाचालक महाराजाविरुद्ध म्हणजेच दासोपंत उर्फ स्वामी हरिभाऊ उंडाळकर (वय ५२) याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर १९/२०२४ कलम भादंवि ३७७ व बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम ४, ५ (F), ६, ८, १० अन्वये गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. यावरून धार्मिक संस्कार तर सोडाच, याउलट धार्मिकतेच्या नावाखाली लहान मुलांचे लैंगिक शोषण करून त्यांचे आत्मबल खच्चीकरण करण्याचा प्रकार वारंवार घडत आहे. यातील काही केसेस बुवालोकांचे नाव खराब होऊ नये म्हणून बुवा महाराजांच्या स्थानिक एजंटांच्या मार्फत मिटविल्या जातात.

तसेच, अनेक दुर्दैवी घटनांमध्ये गुन्हे दाखल होतातच असे नाही. तर जे गुन्हे दाखल होतात अशा काही केसेसमध्ये काही बुवांना कोर्टाकडून शिक्षा ही ठोठावण्यात आल्या आहेत, ते शिक्षा भोगत आहेत. हे वारकरी संप्रदायाचा वारसा पुढे नेणाऱ्या सुसंस्कृत महाराष्ट्राला अशोभनीय आहे, याला वेळीच रोखणे गरजेचे झाले आहे. असे संभाजी ब्रिगडच्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. वरील घडलेले अनेक प्रकार पाहता आळंदी विभागातील ज्या वारकरी शिक्षण संस्था विद्यार्थी वसतिगृहाच्या नियमानुसार असतील त्यांना रीतसर परवानगी देऊन, त्या शासकीय नियमाच्या कक्षेत आणणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येक संस्थेची पोलीस प्रशासन तसेच शासनामार्फत अधून-मधून तपासणी करण्यात यावी. प्रत्येक संस्थेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करण्यात यावे, व या कॅमेऱ्यांचा ॲक्सेस ऑनलाइन पद्धतीने हा त्या-त्या मुलांच्या पालकांना देण्यात यावा. अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी निवेदणाद्वारे केली आहे.यावेळी निवेदनावर संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष गणेश दहिभाते, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण उपाध्यक्ष वैभव जाधव यांच्या साह्य आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button