breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘पुणे, चंद्रपुरात निवडणूक घ्यायची हिंमत नाही’; सामनातून केंद्र सरकारवर हल्लाबोल

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकासाठी सत्ताधारी आणि विरोधक कामाला लागले आहेत. नुकत्याच झालेल्या सात विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये एनडीएला ३ तर इंडिया आघाडीला चार जागा मिळाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर हल्लाबोल केला आहे.

सामनाच्या अग्रलेखात म्हटलं की, जागतिक महाशक्ती आपण बनतोच आहोत अशी हवा मोदी व त्यांचे प्रचारक निर्माण करीत आहेत. पण सहा राज्यांतील सात विधानसभा पोटनिवडणुकांच्या निकालाने ही ‘हवा’ काढून घेतली. जगात महाशक्ती व स्वदेशात राजकीय शक्तिपात असे चित्र आता स्पष्ट झाले. सात विधानसभा पोटनिवडणुकांत ‘इंडिया’ आघाडीस चार तर मोदीप्रणीत एनडीएला तीन जागा मिळाल्या. या तीनपैकी दोन जागा त्रिपुरा राज्यातल्या आहेत. २७ पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची ही पहिली चाचणी परीक्षा होती व त्या परीक्षेत ती पास झाली आहे.

हेही वाचा – राज्याच्या आरोग्य मंत्र्यांकडून ‘‘मानव सेवा हिच ईश्वर सेवा’’ चा संदेश!

उत्तर प्रदेशातील घोसीच्या जागेवर सपातून भाजपात गेलेले आमदार दारासिंह चौहान यांनी राजीनामा दिला व तेथे निवडणूक झाली. घोसी जिंकण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री आदित्यनाथ, त्यांचे दोन उपमुख्यमंत्री, डझनभर मंत्री, शंभरावर आमदार मतदारसंघात ठाण मांडून बसले होते. सत्ता व पैशांचा वापर झाला. तरीही घोसीच्या मतदारांनी भाजपवासी झालेल्या दारासिंह चौहान यांचा दारुण पराभव केला. तेथे ‘सपा’चे सुधाकर सिंह यांनी मोठा विजय संपादन केला. उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यातील हे ‘क्लायमेट चेंज’ म्हणजे हवामान बदलाचे उदाहरण आहे. 80 जागा या एका राज्यात आहेत, असं सामनात म्हटलं आहे.

दिल्लीत ‘जी-20’चा दरबार भरला आहे. मोदींची लोकप्रियता जागतिक पातळीवर वाढली वगैरे ठीक आहे, पण इकडे स्वदेशात त्यांच्या लोकप्रियतेला उतरती कळा लागली हे निवडणूक निकालाने स्पष्ट झाले. चार महिन्यांपूर्वी पुण्यातील कसब्यात भाजपचा गड ‘इंडिया’ गटाच्या काँग्रेसने जिंकला. महाराष्ट्रात पुणे, चंद्रपूर या दोन लोकसभा रिकाम्या आहेत. पण तेथे निवडणूक घेण्याची हिंमत भाजप प्रायोजित निवडणूक आयोगात नाही. कारण लोकांत पंतप्रधान मोदी व त्यांच्या सरकारविरोधात संताप आहे. फसवणूक व लुच्चेगिरीची नऊ वर्षे देशाच्या नाकीनऊ आणणारी ठरली. लोक आता फसवणूक करून घ्यायला तयार नाहीत, असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button