अजित पवारांनी अमृता फडणवीसांचा केलेला उल्लेख आठवत फडणवीसांचे जशास तसं उत्तर
आजचं भाषण १०० टक्के अजित पवारांचं वाटत नव्हतं, ५० टक्के जयंत पाटलांचे वाटले
नागपुर : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. अधिवेशनादरम्यान सभगृहात बोलतान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीचा संदर्भ देत एक विधान केलं होतं. पवारांच्या या विधानाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जशास तसं उत्तर दिलं आहे.
अजित पवारांनी, मी आता येऊन अमृता वहिनींनाच सांगणार आहे की जरा बघा यांच्याकडं रात्री. त्यांनी मनावर घेतलं की लगेच एखादी महिला मंत्री होईल. मला खात्री आहे, असं म्हटलं अन् सभागृहामध्ये एकच हशा पिकला. अजित पवारांनी अमृता फडणवीसांचा केलेला उल्लेख आठवत अजित पवारांनाच प्रश्न विचारला. खरं म्हणजे दादांनी सांगितलं की एकदा अमृताशी बोला. पण दादा हे बोलताना तुम्ही सुनेत्राताईंना विचारलं होतं? असा प्रश्न फडणवीसांनी अजित पवार यांना विचारला.
विरोधी पक्षनेत्यांचं भाषण मी अनेकदा ऐकलं आहे. मात्र यावेळीचं भाषण जयंतरावांनी लिहून दिल्यासारखं वाटलं. जयंतराव बाहेर आहेत त्यामुळे त्यांचं भाषण पाहायला मिळालं. अजित पवारांचं भाषण कायमच रोखठोक असतं. पण त्यांचं या वेळचं भाषण १०० टक्के अजित पवारांचं वाटत नव्हतं. त्यातील ५० टक्के मुद्दे जयंत पाटलांचेही वाटत होते, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अजित दादांनी अनेक गोष्टींवर चर्चा केली. कोण मुख्यमंत्री झाले, किती झाले वगैरे.. पण दादा एका गोष्टीचे दु:ख आहे, तुम्हाला मुख्यमंत्री होण्याची संधी असतानाही पवारसाहेबांनी तुमची संधी हिरावून घेतली. २००४ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीमधील कराराप्रमाणे ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असं असताना, शरद पवारांनी तुम्हाला मुख्यमंत्री न करता काँग्रेसला संधी दिली, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.