शरद पवारांच्या विचारांवर प्रेम करणारा पुणे पदवीधर मतदार संघ : उपमुख्यमंत्री अजित पवार
- महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांमध्ये एकोपा
- अरुण लाड यांच्या प्रचारासाठी चिंचवडमध्ये मेळावा
पिंपरी । प्रतिनिधी
पुणे विभागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यातून विविध विकासकामे झाली आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांवर प्रेम करणारा पुणे पदवीधर मतदार संघातील मतदार आहे. गेल्या तीन टर्ममध्ये विरोधी उमेदवारांनी काय काम केले हे लोकांना माहीत आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकोप्याने कामाला लागावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
पुणे पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचारानिमित्त चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात रविवारी प्रचार मेळावा घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार आण्णा बनसोडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे आदी उपस्थित होते.
भाजपा सरकारच्या काळात सत्तेचा गैरवापर…
अजित पवार म्हणाले की, मार्च महिन्यापासून देशासह जगभरात कोरोनाचे महासंकट आले आहे. काही शिक्षकांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत म्हणजे भाजपा सरकारच्या काळात राज्यात सत्तेचा गैरवापर कसा झाला? हे जनतेने पाहिले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह अनेकदा पुरोगामी विचाराचे सरकार होते. पण, आम्ही कधी सत्तेचा माज येवू दिला नाही. सत्तेचा अतिरेक केला नाही, असा घणाघातही अजित पवार यांनी यावेळी केला.