breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

कल्पिता पिंपळेंची भेट घेतल्यानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई |

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अधिकारी कल्पिता पिंपळे यांची भेट घेतली आहे. फेरीवाल्यांकडून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात कल्पिता पिंपळे जखमी झाल्या होत्या. दुपारी एकच्या सुमारास राज ठाकरे हे ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात त्यांची विचारपूस करण्यासाठी आले होते. मंगळवारी घेतलेल्या (३१ ऑगस्ट) पत्रकार परिषदेत या घटनेवर भाष्य केल्यानंतर आज (१ सप्टेंबर) स्वतः राज ठाकरे कल्पिता पिंपळे यांच्या भेटीसाठी ठाण्यात आले.

दरम्यान, या भेटीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यावेळी म्हणाले कि, “मी आश्वासन वगैरे काही दिलेलं नाही. मी फक्त त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला आलो होतो. लवकर बरं व्हा एवढंच सांगितलं आहे.” यावेळी राज ठाकरे यांच्यासह मनसे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई देखील उपस्थित होते.

  • “लवकर बऱ्या व्हा. बाकी आम्ही बघतो”

जखमी अधिकारी कल्पिता पिंपळे यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले कि, “आमचं आंदोलन अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात असतं. मी काल जे म्हटलं त्याप्रमाणे, जे काही घडलं त्याचं निश्चितच दु:ख आहे. पण काळही सोकावतो. अशा प्रकारची हिंमत ठेचणं गरजेचं आहे. पोलीस त्यांची कारवाई करतच आहेत. न्यायालय देखील त्यांचं काम करेल अशी आमची पूर्ण अपेक्षा आणि आशा आहे.” दरम्यान कल्पिता पिंपळे आणि राज ठाकरे यांच्या भेटीचा एक व्हिडीओ समोर येत आहे.”तुम्ही लवकर बऱ्या व्हा. बाकी काय करायचं ते आम्ही बघतो”, असा आश्वासन राज ठाकरे यांनी दिल्याचं यात पाहायला मिळत आहे.

  • “ह्यांची मस्ती उतरवली पाहिजे”

राज ठाकरे मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले होते कि, “फेरीवाल्यांची मस्ती उतरवली पाहिजे. ह्यांची जेव्हा बोट छाटली जातील आणि जेव्हा फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही तेव्हा ह्यांना कळेल. हिंमत कशी होते ह्यांची? इतक्या वर्षांत मी कधी असं पाहिलेलं नाही. बोट छाटली एका अधिकाऱ्याची? हा काय प्रकार आहे. आता पोलिसांकडून सुटून आल्यानंतर त्यांना नेमकी खरी भीती काय असते ते कळेल.”

  • नक्की काय घडलं?

गेल्या काही दिवसांपासून ठाणे महापालिकेने रस्ते अडविणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार, महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या पथकामार्फत सोमवारी कारवाई सुरू होती. सायंकाळी ६.३० च्या सुमारास पिंपळे यांच्या पथकाने कासारवडवली येथील बाजारपेठेत भाजीविक्रेता अमरजीत यादव याची गाडी जप्त केली. त्यामुळे अमजीत याने पिंपळे यांच्या पाठीमागून येऊन त्यांच्या डोक्यावर सुऱ्याने वार करण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला वाचविण्यासाठी पिंपळे यांनी सुरा पकडला. मात्र, त्यावेळी त्यांच्या डाव्या हाताची तीन बोटे कापली गेली. पिंपळे यांच्या बचावासाठी गेलेल्या त्यांच्या अंगरक्षकावरही अमरजीतने हल्ला केला. यात त्याच्याही डाव्या हाताचे बोट कापले गेले.

  • अटक आणि गुन्हा

घटनेनंतर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने अत्यंत शिताफीने अमरजीतला ताब्यात घेतले. त्यानंतर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात अमरजीत विरोधात तक्रार नोंदविली. या तक्रारीच्या आधारे, त्याच्याविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button