breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पावसाची विक्रमाकडे वाटचाल; येत्या ४८ तासांत मुसळधारेचा इशारा

पुणे |

किनारपट्टी भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे मुंबई, ठाणे परिसरासह संपूर्ण कोकण विभागात धुवाधार पाऊस सुरू असून, तो विक्रमाकडे वाटचाल करीत आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये देशातील सर्वाधिक पाऊस रायगड जिल्ह्य़ातील उरणमध्ये, ४५० मिलिमीटर इतका नोंदविला गेला. त्यापाठोपाठ ठाण्यात २९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कमी दाबाचा पट्टा आणखी तीन ते चार दिवस कायम राहण्याची शक्यता असल्याने मुंबई, ठाण्यासह कोकणात आणि पश्चिम मध्य महाराष्ट्रातील घाट भागांमध्ये या कालावधीत जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने कायम ठेवला आहे.

महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून कर्नाटक किनारपट्टीपर्यंत गेल्या तीन ते चार दिवसांपासून कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. सोमवारीही (१९ जुलै) मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे आदी जिल्ह्य़ांमध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळला. कोकणात नद्यांच्या पातळीत वाढ झाली असून, मुंबई-ठाण्यातील जोरदार पावसाने जनजीवनावर परिणाम झाला आहे. मध्य महाराष्ट्रात नगर जिल्ह्य़ातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत हंगामात प्रथमच मुसळधार पाऊस झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

कोकण विभागातील पावसाचे प्रमाण सर्वाधिक असून, रविवारी (१८ जुलै) रात्री ८ ते सोमवारी (१९ जुलै) सकाळी ८ या २४ तासांत देशात झालेल्या सर्वाधिक पावसाची आकडेवारी भारतीय हवामान शास्त्र विभागाने जाहीर केली आहे. त्यात ४५० मिलिमीटर पावसाची नोंद होणारे उरण पहिल्याच क्रमांकावर उरण आहे. त्यापाठोपाठ ठाण्यात २९० मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला. राज्यातील बहुतांश जिल्ह्य़ांत या हंगामाच्या दीड महिन्यातही इतका पाऊस झालेला नाही. पुणे शहरात १ जूनपासून आतापर्यंत पडलेला पाऊस पाहता तो केवळ १९५ मिलिमीटरच्या आसपास आहे.

  • २४ तासांतील पाऊसनोंद

कोकण : उरण (४५० मि.मी.), ठाणे-बेलापूर (२९० मि.मी.), पनवेल (२८० मि.मी.), माथेरान, मुरूड (२७० मि.मी.), सानपाडा दापोली, कणकवली (२४० मि.मी.), मुंब्रा (२३० मि.मी.), ऐरोली (२२० मि.मी.) लांजा, माणगाव, विक्रमगड (२१० मि.मी.), देवगड, रोहा, उल्हासनगर (२०० मि.मी.), कर्जत, खालापूर, मालवण, कल्याण, पेण (१८० मि.मी.), गुहागर, सुधागड पाली, वैभववाडी (१७० मि.मी.). मध्य महाराष्ट्र : इगतपुरी (२२० मि.मी.), गगनबावडा (१८० मि.मी.), लोणावळा (१७० मि.मी.), महाबळेश्वर (१०० मि.मी.)

  • पाऊसभान…

  • पुढील चार दिवस मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्य़ांत जोरदार ते मुसळधारेचा अंदाज.
  • मुंबई-ठाण्यात २१ जुलैला, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत काही ठिकाणी २१, २२ जुलैला अतिमुसळधारेचा इशारा.
  • पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्य़ांतील घाट क्षेत्रातही याच कालावधीत जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता.
  • उत्तर महाराष्ट्रात हलका, तर विदर्भात काही ठिकाणी मध्यम सरींची शक्यता.
  • कळव्यात दरड कोसळून पाच ठार

ठाणे : कळवा येथील घोलाईनगरमध्ये सोमवारी दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. मृत आणि जखमी एकाच कुटुंबातील आहेत. प्रभू यादव (४५), विद्वती यादव (४०), रविकिशन यादव (१२), सिमरन यादव (१०) आणि संध्या यादव (३) अशी मृतांची, तर प्रीती यादव (५) आणि अचल यादव (१८) अशी जखमींची नावे आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button