TOP Newsताज्या घडामोडीपुणे

पेठांमधील व्यावसायिकांच्या कचऱ्याचे संकलन आता मध्यरात्रीच

पुणे : शहरातील मध्यवर्ती भाग आणि प्रमुख पेठांमधील व्यावसायिकांकडील कचरा मध्यरात्री संकलित करण्यात येणार आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने त्याबाबतचा निर्णय घेतला आहे. शनिवार-रविवारीही हा उपक्रम सुरू राहणार आहे. कोणत्या भागातील कचरा कधी उचलला जाणार आहे, याचे वेळापत्रक व्यावसायिकांना महापालिकेकडून देण्यात आले आहे. त्यामुळे पेठांचा भाग मध्यरात्रीच चकाचक होणार आहे. घरगुती कचऱ्याचे संकलन मात्र नियमितपणे सकाळीच होणार आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे व्यवसाय आहेत. लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, रास्ता पेठ, शनिवार पेठ, अप्पा बळवंत चौक, तुळशीबाग, रविवार पेठ, बुधवार पेठ या भागामध्ये व्यावसायिक अस्थापना आणि उपाहारगृहे आहेत. त्यामुळे या परिसरातील दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होतो. सध्या प्रत्येक दुकानात जाऊन कचरा संकलन करण्याची कोणतीही यंत्रणा महापालिकेकडे नाही. महापालिकेकडून दररोज सकाळी या भागाबरोबरच शहरातील सर्वच प्रमुख ठिकाणचे रस्त्यांची साफसफाई केली जाते. साफसफाईनंतर दुकाने उघडत असल्याने दिवसभराचा कचरा दुकानांबाहेर ठेवला जातो. त्यामुळे बहुतांश ठिकाणी कचरा अस्ताव्यस्त पडलेला असतो. त्याबाबत महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे सातत्याने तक्रारी करण्यात येत होत्या. त्यामुळे आता मध्यरात्री कचऱ्याचे संकलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख आशा राऊत यांनी त्याबाबतची माहिती दिली.

लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, बुधवार पेठ, रास्ता पेठ, शनिवार पेठ, अप्पा बळवंत चौक, तुळशीबाग, तांबडी जोगेश्वरी, शुक्रवार पेठ, मंडई, रविवार पेठ परिसरातील कचऱ्याचे मध्यरात्री संकलन केले जाणार आहे. त्यामुळे सकाळीही हा भाग स्वच्छ राहणार असून शनिवारी आणि रविवारीही कचरा उचलला जाणार आहे. त्यासाठी महापालिका कर्मचारी, स्वच्छ संस्थेचे कर्मचारी तसेच खासगी ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांचे, घंटागाड्या आणि ढकलगाड्यांचे नियोजन महापालिकेने केले आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेनिमित्त कचरा निर्मूलनाला महापालिकेने प्राधान्य दिले आहे. सार्वजनिक ठिकाणी पडणारा कचरा उचलण्यासाठी खास मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत सध्या पहिल्या टप्प्यात व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा कचरा संकलित केला जाणार आहे. आठवड्यातील सातही दिवस या व्यावसायिक भागातील कचरा रात्रीच्या वेळी उचलला जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button