दूध अनुदान कधी मिळणार? सोमेश्वर परिसरात अनुदानाची मागणी

सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील निंबूत, सोमेश्वर, करंजेपूल, वानेवाडी, आदी परिसरातील दूध उत्पादक शेतकरी गेल्या दोन महिन्यांपासून शासनाकडून दूध अनुदान मिळेल, या आशेवर आहेत. नवीन सत्तेवर येणा-या सरकारने जर अचानकपणे दूध अनुदानात बदल केला तर मोठा आर्थिक फटका बसेल, अशी भीती दूध उत्पादकांमध्ये चर्चा सुरू आहे. दरम्यान, दूध अनुदान कधी मिळणार? असा सवाल चिंताग्रस्त दूध उत्पादक शेतकरी करीत आहे. दूध अनुदान देण्याची मागणी सोमेश्वर परिसरातील दुध उत्पादक करीत आहे.
दुधाचे दर जानेवारी २०२४ पासून घसरल्याने दूध व्यवसाय अडचणीत आला. दुधाला बाजारभाव कमी मिळतोय, पशुखाद्यांच्या वाढत्या किंमती, जनावरांचा चारा यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दूध व्यवसाय टिकावा व दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी. याकरिता राज्य सरकारने जानेवारी ते मार्चपर्यंत गायीच्या दुधाला प्रतिलिटर तीन रूपये अनुदान दिले. जुलै २०२४ पासून दुधाचे दर अधिकच घसरल्याने शासनाने त्या अनुदानात वाढ करून पाच रूपये दुध अनुदान दिले. मात्र, ही अनुदाने मिळविण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांची मोठी दमछाक झाली.विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर गाय दूध उत्पादक शेतक-यांना खुश करण्यासाठी राज्य शासनाने अनुदानात आणखी वाढ करीत दि. १ ऑक्टोबर २०२४ पासून सात रूपये दूध अनुदान देण्याची घोषणा करून तसा शासन निर्णय काढला. त्यामुळे आर्थिक संकटात अडकलेल्या दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, या आशेने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
हेही वाचा – ‘मी पुन्हा एकदा त्यांचा बदला घेणार, त्यांना मी..’; देवेंद्र फडणवीस यांचं विधान
त्यातच राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे दूध अनुदान रखडले, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये होती. विधानसभा निवडणुका झाल्या, आचारसंहिता संपली तरी दूध अनुदान मिळत नसल्याने दूध उत्पादक शेतक-यांची घालमेल सुरू झाली आहे. नवीन सत्तेवर येणाऱ्या सरकारने जर अचानकपणे दूध अनुदानाच्या निकषात बदल केला तर मोठा आर्थिक फटका बसेल या विवंचनेत दूध उत्पादक शेतकरी आहेत. मात्र, शासनस्तरावर शेतकऱ्यांना दूध अनुदान देण्यासंबंधी कोणतीच हालचाल दिसून येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर दिसू लागले आहेत. शासनाने दूध दर वाढवून द्यावा किंवा दूध अनुदान कायम ठेवावे, अशी मागणीही शेतकरी करू लागले आहेत. शासनाने आर्थिक चणचणीत सापडलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने दूध अनुदान द्यावे, अशी मागणी सोमेश्वर परिसरातील शेेतकरी करीत आहेत.
जानेवारीपासून गाईच्या दु़धाचे दर कमी झाल्यामुळे दुध उत्पादक शेतक-यांचा दुध व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे दुध उत्पादक शेतक-यांना तातडीने प्रति लिटर सात रूपये दुध अनुदान द्यावे.
– गणेश जगताप. दूध उत्पादक शेतकरी.





