‘मी पुन्हा एकदा त्यांचा बदला घेणार, त्यांना मी..’; देवेंद्र फडणवीस यांचं विधान

Devendra Fadnavis | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस ५ डिसेंबरला शपथ घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा आझाद मैदान याठिकाणी पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत. दरम्यान, फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद निश्चित झाल्यानंतर त्यांनी विरोधकांबाबत केलेलं सूचक विधान सध्या चर्चेत आलं आहे.
गेल्या अडीच वर्षांत विरोधकांकडून पातळी सोडून आपल्यावर टीका झाली, पण आता ते सगळं विसरून काम करणार असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. २०२२ च्या सत्तांतरानंतर फडणवीसांनी भर विधानसभेत बोलताना विरोधकांना माफ करून त्यांचा बदला घेणार असल्याचं विधान केलं होतं. याहीवेळी विरोधकांना माफी हाच आपला बदला असणार असल्याचं ते म्हणाले आहेत.
हेही वाचा – महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा, कुठे व किती वाजता होणार?
विरोधकांनी माझ्यावर बदनामीजनक टीका-टिप्पणी केली. मी पुन्हा एकदा त्यांचा बदला घेणार आहे. पण याहीवेळी त्यांना मी माफ केलं असून त्यांना माफी हाच माझा बदला आहे. मी कधीच कुणाचा द्वेषी नव्हतो. काहींनी त्यांच्या फायद्यासाठी माझी एखाद्या खलनायकासारखी प्रतिमा तयार केली. पण जनतेनं आमच्यावर विश्वास दाखवून त्या सगळ्यांना परस्पर उत्तर दिलं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, यावेळी विरोधकांची संख्या विधानसभेत खूप कमी असली, तरी तेही लोकप्रतिनिधीच असून त्यांच्या भूमिकांकडे अजिबात दुर्लक्ष करणार नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.





