केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा हे प्रथमच पुण्यात येत आहेत. पुण्यामध्ये केंद्रीय गृह विभागाची पश्चिम विभागीय बैठक २२ फेब्रुवारी रोजी कोरेगाव पार्क येथील पंचतारांकीत हाॅटेलमध्ये होणार आहे. त्यासाठीचे नियोजन महापालिकेकडे देण्यात आले असून, याची जबाबदारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांच्याकडे असणार आहे.
याच दिवशी जिल्हा परिषदेच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील घरकुल योजनेच्या घरांचे वाटप करण्यात येणार असून, या कार्यक्रमासही ते उपस्थित राहणार आहेत. बालेवाडी येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा – महावितरणचा ५० हजार वीजग्राहकांशी थेट संवाद
पश्चिम विभागीय बैठकीचे अध्यक्ष अमित शहा असतील. त्यात महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दादरा आणि नगर हवेली, दमण दीव येथील अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेच्या तयारीसाठी जिल्हा प्रशासनाने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
यांसह अन्य ११ अधिकाऱ्यांनाही विविध जबाबदारीचे वाटप केले आहे. घरकुल योजनेत लाभार्थ्यांना पहिला हप्ता आणि घरांच्या मंजुरीचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. संपूर्ण राज्याचा एकत्रित कार्यक्रम पुण्यात होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.