महावितरणचा ५० हजार वीजग्राहकांशी थेट संवाद

पुणे : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा जागर करण्यासाठी पुणे व पिंपरी- चिंचवड शहरांतील विविध भागांमध्ये डिजिटल सौर रथाच्या माध्यमातून आठवडाभरात तब्बल ५० हजारांवर वीजग्राहकांशी महावितरणकडून थेट संवाद साधण्यात आला. यामध्ये डिजिटल स्क्रीनद्वारे संवाद, सादरीकरण व माहितीपत्रकांद्वारे योजनेची माहिती देण्यात आली.
घरगुती ग्राहकांना घराच्या छतावर १ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या अनुदानित सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिटपर्यंत वीज मोफत मिळविण्याची संधी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत आहे. या योजनेचा जागर करण्यासाठी महावितरण व महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (मास्मा) यांच्या सहकार्याने सौर रथाचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा – महापालिकेचा आज अमृतमहोत्सवी वर्धापनदिन
आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज सौर रथाच्या डिजिटल स्क्रिनद्वारे योजनेची माहिती देताना मुख्य अभियंता राजेंद्र पवार, अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड, मास्माचे समीर गांधी यांनी नागरिकांशी आठवडाभर संवाद साधला. उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पाटणी यांनी या योजनेचे फायदे, ऑनलाइन अर्ज, मिळणारे अनुदान आदींचे संगणकीय सादरीकरण केले. हीच माहिती पत्रकांद्वारे देखील देण्यात आली.