आत्मनिर्भर भारत अंतर्गत बनविण्यात आलेली ही १६ वाहने सोमवारी भारतीय लष्कराकडे सुपूर्द करण्यात आली

पुणे : देशाच्या सीमेवर तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता मोहिमेमध्ये सैन्याच्या हालचाली सुरक्षितरीत्या आणि गतिमान करता याव्यात यासाठी भारत फोर्जतर्फे ‘कल्याणी एम-४’ हे पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे वाहन साकारण्यात आले आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत बनविण्यात आलेली ही १६ वाहने सोमवारी भारतीय लष्कराकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मोहिमेसाठी या वाहनांचा उपयोग केला जाणार आहे.
मुंढवा परिसरातील भारत फोर्ज कंपनीमध्ये झालेल्या कार्यक्रमात कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी आणि अमित कल्याणी यांच्या हस्ते या वाहनांची पूजा करण्यात आली. त्यानंतर ही वाहने लष्कराकडे सुपूर्द करण्यात आली.
बाबा कल्याणी म्हणाले,की चीनच्या सीमा रेषेवरील गलवान खोऱ्यात या वाहनाची मार्च २०२० मध्ये चाचणी सुरू करण्यात आली होती. १८ हजार फूट उंचीवर या वाहनाची क्षमता चाचणी सलग दीड महिने करण्यात आली होती. त्याचप्रमाणे कच्छच्या वाळवंटातही या वाहनांची क्षमता सिद्ध करण्यात आली. त्यानंतर भारतीय लष्कराची गरज ध्यानात घेऊन लष्करांच्या अपेक्षांची पूर्ती करण्याच्या उद्देशाने वाहनांची निर्मिती करण्यासाठी भारत फोर्जला परवानगी देण्यात आली. लष्कराला आवश्यक असलेल्या ३६ वाहनांपैकी पहिल्या टप्प्यामध्ये सात वाहने देण्यात आली होती. तर, १६ वाहने आता लष्कराच्या सेवेत तैनात केली जाणार आहेत.
अमित कल्याणी म्हणाले, ‘कल्याणी एम-४’ हे भारतीय लष्कराच्या सर्व अपेक्षांची पूर्ती पूर्ण करणारे हे वाहन आहे. संपूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित या वाहनाची निर्मिती करण्यात आली आहे. दर महिन्याला दहा वाहने तयार करण्याची क्षमता आम्ही विकसित केलेली आहे. लोणी काळभोर परिसरात उत्पादन कारखाना निर्माण करण्यात आला आहे. क्षमता सिद्ध झाल्यानंतर अनेक देशांनी या वाहनाची मागणी केली आहे. परंतु, भारतीय लष्कराची पूर्तता करण्याकडे आम्ही प्राधान्य दिले आहे.
‘कल्याणी एम-४’ वाहनाची वैशिष्टय़े
पर्वतीय आणि वाळवंट क्षेत्रात उच्च कामगिरी
प्रतितास ११० किलोमीटर अंतर कापण्याची क्षमता
उणे २० अंश सेल्सियस ते ५० अंश सेल्सियस अशा विविध तापमानांमध्ये उत्कृष्ट कामगिरी
६० टन वजन वहनाची क्षमता असलेले वातानुकूलित वाहन
दहा जवानांसह अत्याधुनिक शस्त्रास्त्र वहनाची क्षमता
स्वदेशी बनावटीच्या वाहनामध्ये आरामदायी प्रवासाची (सस्पेन्शन) प्रणाली
बॉम्ब प्रतिरोधक वाहन हे वेगळेपण
संरक्षण दलाचे माजी प्रमुख (सीडीएस) आणि तत्कालीन लष्करप्रमुख दिवगंत जनरल बिपीन रावत यांनी अशा प्रकारच्या वाहनाची निर्मिती करण्याबाबत कल्पना सुचविली होती. त्यानुसार उष्ण तसेच थंड वातावरणात वेगवान हालचाल करण्याची क्षमता हे या वाहनाचे बलस्थान आहे. – बाबा कल्याणी, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, भारत फोर्ज