शहरातील वाहनांची संख्या वाढली! २०२४-२५ वर्षात तब्बल इतकी वाहन खरेदी

पुणे : पुणे शहरात रस्त्यावरुन वाहन चालणे ही खूप मोठी कसरत असते. याचे कारण म्हणजे वाढलेली वाहनांची संख्या. दरवर्षी वाहनांच्या विक्रीत झपाट्याने वाढ होत आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात तब्बल ३ लाख ७ हजार २९९ वाहनांची नोंद पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे आता नव्या वाहनांची भर पडल्याने पुण्यातील नोंदणीकृत एकूण वाहनांचा आकडा तब्बल ३९ लाखांपेक्षा जास्त झाला आहे. त्यामुळे वाहन चालवताना मोठी कसरत वाहन चालकांना करावी लागणार आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी वाहतूक कोंडीत असलेल्या शहरांची नावे एका अहवालात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार पुणे शहर जगात चौथे तर देशात तिसरे वाहतूक कोंडीने त्रस्त असलेले शहर म्हणून समोर आले. शहरातील ३९ लाखांपेक्षा अधिक असलेल्या वाहनांमध्ये दुचाकीचे प्रमाण अधिक आहे. वाढत्या वाहनांमुळे शहरातील वाहतूक मंदावलेल्या अवस्थेत आहे.
हेही वाचा – पालिकेच्या जलतरण तलावांवर ठेकेदारांचा ताबा
२०२३-२४ या वर्षात २ लाख ९५ हजार तर २०२४-२५ या वर्षात ३ लाख ७ हजार वाहन खरेदी करण्यात आली आहे. थोडक्यात मागच्या आणि आत्ताच्या वाहन खरेदीत मोठा फरक पाहयला मिळत आहे. यंदा तब्बल १ लाखहून अधिक वाहन खरेदी झाल्याचे आकडेवारीवरुन दिसते. केंद्र सरकार आणि राज्य सरकार ई वाहन खरेदी करण्याचे आवाहन नागरिकांना करत आहे.
मात्र, गेल्या आर्थिक वर्षात १३ हजार ६८९ ई-वाहनांची विक्री झाली आहे. हाच आकडा २०२३-२४ मध्ये ३२ हजार होता. त्यामध्ये ई-बाइक खरेदीचे प्रमाण खूपच घटल्याचे दिसत आहे. २९ हजार ई-बाइक खरेदी होती. यंदा केवळ साडेअकरा हजार ई-बाइक खरेदी करण्यात आल्या आहेत.