राज्यातील उर्वरित पाच टक्के विद्यार्थ्यांचे आधार १५ एप्रिलपर्यंत प्रमाणित करण्याची आयुक्तांची ताकीद

पुणे : राज्यातील शाळांमधील एकूण ९४.७२ टक्के विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक प्रमाणित झाले आहेत. विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणित न होणे, आधारकार्ड उपलब्ध नसणे, यामुळे अद्याप हे काम १०० टक्के पूर्ण होताना दिसून येत नाही. म्हणून आता उर्वरित पाच टक्के विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक प्रमाणित करण्यासाठी १५ एप्रिलपर्यंतची अंतिम मुदत शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली आहे.
राज्यात सर्व विभागाच्या सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीमध्ये शिकणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांचे युडायस प्लस आणि सरल पोर्टलमधील स्टुडंट पोर्टलवर आधार नोंदणी अद्ययावत करण्याचे काम पूर्ण करून संबंधित विद्यार्थ्याचे आधार क्रमांकाची खात्री करणे आवश्यक आहे.
यासाठी राज्य स्तरावरून शिक्षणाधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना देण्यात येत आहेत. मात्र, अद्यापही विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणित करण्याची प्रक्रिया १०० टक्के पूर्ण झालेली नाही. म्हणूनच आता उर्वरित पाच टक्के विद्यार्थ्यांची आधार नोंदणीबाबत खुद्द शिक्षण आयुक्तांनीच संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना परिपत्रकाद्वारे सूचना देत धारेवर धरले आहे.
हेही वाचा – ई-वाहन खरेदीचा वेग मंदावला
विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करण्यासाठी शाळा, केंद्र व तालुकास्तरावर नियोजन करण्यात यावे. त्यासाठी तालुकास्तरावरून काही शाळांसाठी मिळून एक नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, असा आदेश सिंह यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिला आहे.
विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणित करण्यासाठी तंत्रस्नेही शिक्षक, केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी यांच्या मदतीने कार्यवाही करावी. तसेच युडायस प्लस आणि सरल पोर्टलवरील केंद्र प्रमुख, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी आणि विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या लॉगिनवर सर्व संख्यात्मक शाळा-विद्यार्थीनिहाय माहिती उपलब्ध आहे.
या माहितीद्वारे आधार प्रमाणित करण्यात मागे असलेल्या शाळा पाहता येतात, या माहितीच्या आधारे नियमितपणे आढावा घेऊन प्रत्येक शाळेचा पाठपुरावा करून आधार प्रमाणिकरणाची कार्यवाही पूर्ण करता येईल. तसेच याबरोबरच आधार प्रमाणित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या ‘अपार आयडी’ची कार्यवाही देखील पूर्ण करावी, असेही सिंह यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.