ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘धारावीचे पुनर्वसन सगळ्यात मोठा ‘टीडीआर’ घोटाळा’, ठाकरे गटाचा आरोप

अदानी नवे हिंदुहृदयसम्राट आहेत काय? अदानी शेठना मुंबई लुटायची

मुंबई : ठाकरे सरकार पाडण्यासाठी साधारण दोन हजार कोटी रुपये खर्च झाले व त्यातला मोठा भार अदानी शेठ यांनी उचलला. मग या खर्चाची भरपाई कशी व्हायची? शेठजींनी व्यापार चालवला आहे. अदानी शेठने महाराष्ट्रात सरकार पाडण्यासाठी जे दोन हजार कोटी लावले त्या बदल्यात किमान दीड लाख कोटी या शेठना मिळतील आणि त्यासाठी मुंबईतील सर्वच भूखंड त्यांच्या घशात घातले गेले आहेत. धारावीचे पुनर्वसन हा सगळ्यात मोठा ‘टीडीआर’ घोटाळा आहे, असा खळबळजनक आरोप ठाकरे गटाने केला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकारवर टीका करण्यात आली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र सरकारच्या चाव्या अदानी शेठच्याच हातात आहेत, हे अजित पवार यांनी सांगून टाकले. नंतर त्यांनी घूमजाव केले तरी त्यांनी सांगितले तेच खरे आहे. उद्योगपती राज्याचे दुश्मन नसतात, पण अदानी शेठसारखे उद्योगपती महाराष्ट्रच गिळायला निघाले आहेत व त्यासाठी त्यांना त्यांचे हुकूम पाळणारे सरकार हवे आहे, असा घणाघात संजय राऊतांनी केला. भाजपचे राजकारण हे पैसेवाल्यांचे राजकारण आहे. जे आमच्या विचारांचे नाहीत त्यांना पैशाच्या बळावर आम्ही विकत घेऊ शकतो हा त्यांचा माज महाराष्ट्राला खड्ड्यात घालताना दिसत आहे, असेही संजय राऊतांनी म्हटले.

संजय राऊत काय म्हणाले?
अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी शौर्याचा व स्वाभिमानी बनण्याचा कितीही आव आणि ताव मारला तरी ते मोदी-शहांचे गुलाम आहेत. ही सगळी माकडं आहेत व त्यांचे मदारी तिकडे गुजरातमध्ये बसले आहेत. तसे नसते तर अजित पवार यांनी अदानींवर केलेल्या वक्तव्याबाबत चोवीस तासांत ‘यूटर्न’ म्हणजे पलटी मारली नसती. सरकार पाडापाडीच्या खेळासंदर्भात जी बैठक झाली त्या बैठकीस फडणवीस वगैरे लोकांसोबत स्वतः अदानी शेठ हे उपस्थित असल्याचा स्फोट पवारांनी केला व महाराष्ट्राच्या राजकारणावर मोदी-शहा व अदानी यांचा कसा पगडा आहे ते स्पष्ट केले. पण पुढच्या चोवीस तासांत अजित पवार यांनी घूमजाव केले व आपल्या वक्तव्यातून अदानी शेठचे नाव वगळले. आता अजित पवार सांगत आहेत, त्या बैठकीस अदानी शेठ उपस्थित नव्हते. दिल्ली-गुजरातमधील भाजप शेठ मंडळींचा बांबू आल्यामुळे अजित पवारांना माघार घ्यावी लागली. अजित पवार त्यांच्या भाषणात वगैरे नेहमी सांगतात, मी कुणाच्या बापाला भीत नाही. मी नेहमी खरेच बोलतो. पण अजित पवार यांची सध्याची अवस्था व चेहरा पाहता त्यांचे हे बोलणे खरे नाही, असे संजय राऊत म्हणाले.

शिंदे-अजित पवार यांचे मदारी डमरू वाजवतात व त्यावर हुकूम हे उड्या मारतात. हे महाराष्ट्राची जनता पाहात आहे. भाजपचे राजकारण हे पैसेवाल्यांचे राजकारण आहे. जे आमच्या विचारांचे नाहीत, त्यांना पैशाच्या बळावर आम्ही विकत घेऊ शकतो. हा त्यांचा माज महाराष्ट्राला खड्ड्यात घालताना दिसत आहे. शिंदे व अजित पवार यांचा असा दावा होता की, फार मोठ्या उदात्त विचारांमुळे त्यांना आपापले पक्ष सोडावे लागले. शिंदे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाशी फारकत घेतली हे सहन झाले नाही. पण गौतम अदानी हे त्यांचे नवे हिंदुहृदयसम्राट आहेत काय? की या श्रीमंत हिंदुहृदयसम्राटांच्या मार्गदर्शनाखाली बैठका घडवून शिवसेना फोडण्याबाबत, महाराष्ट्रातील सरकारे उलथवण्याबाबत निर्णय झाले?असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.

धारावीचे पुनर्वसन सगळ्यात मोठा ‘टीडीआर’ घोटाळा
राज्यात अदानी, लोढा, आशर वगैरे बिल्डर व उद्योगपतींची दलाली करणारे सरकार सत्तेवर बसवले आहे. महाराष्ट्र सरकारच्या चाव्या अदानी शेठच्याच हातात आहेत, हे अजित पवार यांनी सांगून टाकले. नंतर त्यांनी घूमजाव केले तरी त्यांनी सांगितले तेच खरे आहे. उद्योगपती राज्याचे दुश्मन नसतात, पण अदानी शेठसारखे उद्योगपती महाराष्ट्रच गिळायला निघाले आहेत व त्यासाठी त्यांना त्यांचे हुकूम पाळणारे सरकार हवे आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी आमदारांना पन्नास-पन्नास कोटी रुपये देण्यात आले. हा सर्व पैसा कोणी पुरवला हे अजित पवार यांच्या गौप्यस्फोटातून समोर आले. ठाकरे सरकार पाडण्यासाठी साधारण दोन हजार कोटी रुपये खर्च झाले व त्यातला मोठा भार अदानी शेठ यांनी उचलला. मग या खर्चाची भरपाई कशी व्हायची? शेठजींनी व्यापार चालवला आहे. त्यांनी धर्मादाय कार्य सुरू केलेले नाही. रुपया लावला तर बदल्यात पाच हजारांची परतफेड व्हावी असा त्यांचा हिशोब आहे

त्यामुळे अदानी शेठने महाराष्ट्रात सरकार पाडण्यासाठी जे दोन हजार कोटी लावले त्या बदल्यात किमान दीड लाख कोटी या शेठना मिळतील व त्यासाठी मुंबईतील सर्वच भूखंड त्यांच्या घशात घातले गेले आहेत. धारावीचे पुनर्वसन हा सगळ्यात मोठा ‘टीडीआर’ घोटाळा आहे. त्यातून भाजपचे हे शेठजी सव्वा लाख कोटी मिळवतील. शिवाय मुंबईतील मिठागरे, जकात नाके, दूध डेअऱ्यांच्या जमिनीही शेठना दिल्या. अशा पद्धतीने सरकार पाडणे, आमदार विकत घेणे या खर्चाच्या बदल्यात शेठजींना किमान दीड लाख कोटी मिळतील. या कमाईतला मोठा हिस्सा महाराष्ट्रातील निवडणुकीतही ते टाकत असतील. भाजपचा हा पैसा पुन्हा त्यांच्याकडेच पोहोचत आहे. त्यामुळे भाजपच्या राजकीय बैठकांना अदानी शेठ उपस्थित राहात असतील तर त्यात धक्कादायक असे काहीच नाही. देशाच्या कारभारात व प्रशासनात अदानी शेठचा सुरू आहे, असेच स्पष्टपणे दिसत आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

अदानी शेठना मुंबई लुटायची
अदानी हे महाराष्ट्रातील राजकीय बैठकांना उपस्थित राहतात व त्यांना हवे तसे निकाल घेतात. आपल्या राज्यात हे असे कधी घडले नव्हते. उद्योगपतींचा वाढता हस्तक्षेप राज्याच्या विकासाला बाधक ठरेल, हे तर आहेच, पण राज्याची सूत्रे अदानी शेठसारख्या उद्योगपतींकडे गेल्याने त्यांच्या मनासारखे घडत नसेल तर सरकार अस्थिर करण्यासही ते मागेपुढे पाहणार नाहीत. अजित पवारांनी अदानी शेठबाबतचे सत्य सांगितले व चोवीस तासांत घूमजाव केले. यामागे दाबदबावच आहे. महाराष्ट्रातील सरकार पाडण्यामागे शिंदे-मिंधे टोळीचा कोणताच विचार व नैतिकता नव्हती. अदानी शेठना मुंबई लुटायची आहे म्हणून महाविकास आघाडी सरकार पाडले गेले, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. या अदानी शेठचे करायचे काय? ते मऱ्हाठी जनतेने ठरवायचे आहे, असे आवाहन संजय राऊतांनी केले.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button