ताज्या घडामोडीपुणे

स्वारगेट ते कात्रज भुयारी मार्गाच्या कामाला वेग; पहिल्या ‘सेग्मेंट’चे कास्टिंग सुरू

पुणे | पुणे शहरातील मेट्रोचे जाळे दिवसेंदिवस विस्तारत आहे. यामुळे पुणेकरांचा प्रवास आणखी सुकर न आरामदायी होत आहे. शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मैलाचा दगड ठरणाऱ्या पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते कात्रज या विस्तारित मार्गिकेच्या कामाला आता गती मिळाली आहे. या मार्गिकेवरील महत्त्वाच्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली आहे.

स्वारगेट ते कात्रज मेट्रो या ५.४६ किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गिकेसाठी आवश्यक असलेल्या पहिल्या ‘टीबीएम टनेल सेग्मेंट’च्या कास्टिंगचे काम सुरू झाले आहे. ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते हे कास्टिंगचे काम सुरू करण्यात आले. या प्रसंगी महामेट्रोचे संचालक (कार्य) अतुल गाडगीळ, संचालक (प्रणाली व संचालन) विनोदकुमार अग्रवाल, संचालक (वित्त) हरेंद्र पांडे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी आणि कंत्राटदार कंपनी ‘सीईएम इंडिया’चे प्रतिनिधी उपस्थित होते. स्वारगेट ते कात्रज या विस्तारित मार्गिकेमुळे दक्षिण पुणे थेट मेट्रोच्या जाळ्याशी जोडले जाणार आहे. या मार्गावर एकूण पाच भुयारी स्थानके असणार आहेत.

हेही वाचा

आरपीआय कामगार आघाडी महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल मोरे यांची मोशी परिसरात हत्या

स्वारगेट ते कात्रज हा मार्ग पूर्णतः भुयारी असून, त्याचे बांधकाम अत्याधुनिक ‘टनेल बोरिंग मशिन’द्वारे केले जाणार आहे. या बोगद्याच्या अंतर्गत मजबुतीकरणासाठी प्रीकास्ट आरसीसी ‘सेग्मेंट’चा वापर केला जातो. या मार्गिकेवरील दोन्ही बाजूंचे बोगदे मिळून ९.७ किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी एकूण ६ हजार ९९३ रिंग तयार केल्या जाणार आहेत. प्रत्येक रिंग ही पाच ‘सेग्मेंट’ आणि एक ‘की सेग्मेंट’ या रचनेत असेल. यासाठी ‘सीबीई’ ग्रुपचे आठ विशेष साचे वापरले जात आहेत. मेट्रोच्या बोगद्याचा बाह्य व्यास ६.३५ मीटर असून, अंतर्गत व्यास ५.८ मीटर आहे. प्रत्येक सेगमेंटची जाडी २७५ मिलिमीटर असून, रिंगची रुंदी १.४ मीटर आहे.

स्वारगेट ते कात्रज हा मार्ग पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पहिल्या सेग्मेंटचे कास्टिंग सुरू होणे हे या प्रकल्पाच्या वेगाचे प्रतीक आहे. दर्जा आणि सुरक्षिततेची सर्व मानके पाळून हे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. या मार्गिकेमुळे स्वारगेट, धनकवडी, पद्मावती आणि कात्रज परिसरातील वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार असून, प्रवाशांचा वेळ आणि इंधन वाचणार आहे, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

स्वारगेट ते कात्रज मार्गावरील स्थानके

  • मार्केट यार्ड
  • बिबवेवाडी
  • पद्मावती
  • बालाजीनगर
  • कात्रज

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button