जलसंपदाच्या त्या जागांचे सर्वेक्षण करा; मंत्री विखे- पाटील यांच्या नियामक मंडळाच्या बैठकीत सूचना

पुणे : पाटबंधारे महामंडळाकडील स्थावर मालमत्तांचे व्यवस्थापन नियोजन, निधी स्रोत बळकटीकरण व उभारणी, व्यावसायिक तत्त्वावर प्रकल्प उभारणी करण्यासाठी प्रतिथयश खासगी वित्तीय सल्लागाराची नेमणूक करण्याच्या सूचना जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे- पाटील पाटील यांनी दिल्या आहेत. याशिवाय महामंडळाच्या अखत्यारीत अनेक ठिकाणी विनावापर स्थावर मालमत्ता आहेत. त्याची माहिती संकलित करण्याच्या सूचनाही विखे- पाटील यांनी या वेळी दिल्या.
कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची ११२ वी बैठक झाली. बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, लाभ क्षेत्र विकास सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्यासह वित्त व नियोजन विभागाचे आणि महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा – एचएसआरपी बसविण्यासाठी मुदतवाढ; २५ लाख वाहनांना ही नंबर प्लेट बसवावी लागणार
जलसंपदा मंत्री विखे- पाटील म्हणाले, महामंडळाकडे स्वतःचे उत्पन्न वाढले, तर सिंचन प्रकल्पाची अनेक कामे मार्गी लागतील. या वाढीव उत्पन्नातून उपसा सिंचन योजनांचा देखभाल दुरुस्तीचा खर्च भागवणे शक्य होईल. उत्पन्नवाढीसाठी महामंडळाच्या ताब्यात असलेल्या जमिनीची माहिती संकलित करावी. या जागांची मोजणी करून घ्यावी.
नियामक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली कामे कालबद्ध रीतीने पूर्ण झाली पाहिजेत. या कामांचे सुयोग्य व सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, असेही विखे- पाटील यांनी स्पष्ट केले.