मुक्त रहा… मस्त रहा ! : पियूष मिश्रा यांचा तरुणाईशी मनमोकळा संवाद
डेक्कन लिटरेचर फेस्टीव्हलमधील संवाद सत्राला प्रतिसाद
पुणे : मुक्त रहा… मस्त रहा ! आवडेल तेच करा ‘ अशा शब्दात अभिनेते -लेखक – कवी पियूष मिश्रा यांनी तरुणाईशी मनमोकळा संवाद साधला.
निमित्त होते तिसऱ्या डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हल मधील ‘ दिल से.. पियूष ‘ या संवाद कार्यक्रमाचे ! डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलच्या उद्घाटनानंतरचे सत्र ‘ आरंभ है प्रचंड ‘ च्या आरोळीने गाजले. तरूणाईने टाळया वाजवत साथ दिली.
बालगंधर्व रंगमंदिर येथे हा कार्यक्रम झाला. सलीम अरीफ( लखनौ ) यांनी मिश्रा यांच्याशी संवाद साधला.
मिश्रा म्हणाले, ‘माझा प्रवास हा लहानपणी लाजाळू असणाऱ्या, मार खाणाऱ्या मुलाचा प्रवास आहे. सिनेसृष्टीत येण्यासाठी आपल्याकडे ‘दर्द ‘ असावा लागतो, ‘पॅशन ‘ असणे आवश्यक असते , असे सांगितले जाते. पण, पैसे मिळविण्यासाठी आलोय, हे कोणी आल्यावर सांगत नाही. आता माझ्याकडे पैसा, प्रसिध्दी कुटुंब सर्व काही आहे. पण, मी मला जे आवडते तेच करतो, तेच लिहितो. ‘ बकवास ‘ करतो, असे मी म्हणतो. मुंबईत राहात असलो, तरी भारतभर मी तरुणाईच्या मनात काय चाललंय, हे शोधायला बाहेर पडतो त्यांचे नवे आविष्कार म्हणजे अगदी नव्या शिव्या ऐकायलाही आवडतात.
सिनेसृष्टीत फार कष्ट करावे लागत नाहीत, पण यशासाठी वाट पाहावे लागते. यश टिकवायला फार धडपड करावी लागते. यश मिळालेल्या प्रत्येकाच्या डोक्यावर टांगती तलवार असते.मी यश टिकवायला वगैरे काम करत नाही. आवडेल ते करत राहतो. त्यामुळे स्पर्धपासून वाचतो. इम्तियाज अली, अनुराग कश्यप यांच्यासमवेत काम करण्याचे अनुभवही त्यांनी रंगवून सांगीतले.
राजकीय मतांबद्दल प्रश्नाला उत्तर देताना पियूष मिश्रा म्हणाले, ‘ आधी मी काँग्रेस विचाराचा होतो. आता मोदी, केजरीवाल आवडतात. मी ‘ इन्कीलाब झिंदाबाद म्हणत असलो, तरी कम्युनिस्टापासून मी लांब राहतो. भगतसिंग यांच्याबद्दल देशाने अजून समजून घेण्याची गरज आहे.
डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलच्या मार्गदर्शक मोनिका सिंह यांनी पुष्पगुच्छ देऊन पियूष मिश्रा यांचे स्वागत केले. ‘ आरंभ है प्रचंड ‘ गीत गाऊन पियुष मिश्रा यांनी रसिकांची मने जिंकली. रसिकांच्या फर्माईशी वर खुसखुशीत भाष्य करून पुन्हा भेटण्याचे वचन दिले.





