कोरेगाव पार्कमध्ये गोळीबार; टोळक्याचा सराईत गुंडावर हल्ला

कोरेगाव पार्क भागात गुंडावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. गुंडाच्या डोक्यात सिमेंटचे गट्टू मारून त्याचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी सराईत गुन्हेगारासह सहा जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सागर कोळनट्टी (वय ३६, रा. ताडीवाला रस्ता ) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सराईत गुंड सोन्या दोडमणी (वय २८) याच्यासह सहाजणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीनजणांना ताब्यात घेतले आहे. दोडमणी याने पिस्तुलातून गोळीबार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सागर आणि त्याचे मित्र वाढदिवस साजरा करण्यासाठी कोरेगाव पार्कमधील एका हॉटेलमध्ये गेले होते. तेथून ते बाहेर पडल्यावर मध्यरात्री हॉटेलच्या परिसरात दबा धरून बसलेल्या टोळक्याने सागरवर पिस्तुलातून गोळीबार केला. त्याला बेदम मारहाण केली. त्याच्या डोक्यात सिमेंटचे गट्टू मारले. या घटनेनंतर परिसरात घबराट उडाली. सागरचा मित्र इम्रान हमीद शेख (वय ३०) याने याबाबत कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वेताळ तपास करत आहेत.