‘सर्व जाती धर्मासाठी संभाजीराजांचे योगदान’; उपमुख्यमंत्री अजित पवार

लोणीकंद : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या ३३६ व्या बलिदान दिनानिमित्त श्री क्षेत्र तुळापूर (हवेली) व श्री क्षेत्र वढू बुद्रुक (शिरूर) येथे आज पहाटेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाधीस्थळावर महाराजांचे दर्शन घेत अभिवादन केले. महाराजांचे सर्व जाती धर्मासाठी योगदान होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मातील मावळ्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
त्यापाठोपाठच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी देखील ९ वर्षांच्या काळात आपले शौर्य दाखवले. त्यामुळे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना एका विशेष समाजामध्ये बांधून ठेऊ नका, असे सांगत आपल्याच काहिंनी फितुरी केली असे म्हणत संभाजी महाराजांच्या बलिदान मागील ऐतिहासिक घटनांवर उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रकाश टाकला. महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांचा शासन बंदोबस्त करणार असल्याचे देखील अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
यावेळी श्री क्षेत्र तुळापूर येथे शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके, तुळापूरच्या सरपंच गुंफा इंगळे, चेअरमन शिवाजी शिवले, हवेली तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्षा रसिका चोंधे, राष्ट्रवादी महिला अध्यक्ष लोचन शिवले, राष्ट्रवादी सरचिटणीस संपत शिवले, श्री क्षेत्र वढू येथे सरपंच ज्ञानेश्वर भंडारे, उपसरपंच रेखा सोनेश शिवले, चेअरमन संतोष शिवले, माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन भंडारे आदींसह ग्रामस्थ व शंभूभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा – ‘लाडकी बहिण’ योजनेवर नीलम गोऱ्हे यांच मोठं विधान; विधिमंडळातील कामकाजावर केले भाष्य
छत्रपती संभाजी महाराज स्मारक विकासाठी २६९ कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यावर दोन्ही समाधीस्थळी जलद गतीने कामही सुरू आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाला साजेसे स्मारक शासनाच्या वतीने साकारण्याचा अनेक दिवसांचा संकल्प होता. तुळापूर येथे स्मारकासाठी आठ एकर जागा उपलब्ध झाली आहे. तर वढु बु. येथे दोन एकर जागा उपलब्ध झाली असून केईएम हॉस्पिटला देण्यात आलेली आणखी दोन एकर जागा ताब्यात घेऊन एकूण चार एकर जागेत छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ आणि परिसराची विकास कामे करण्यात येतील.
या कामांतर्गत संग्रहालय, प्रशासकीय कार्यालय, वैद्यकिय कक्ष, सभागृह, स्मरणिका दुकाने, छत्रपती संभाजी महाराज यांचे ६० ते ६५ फुट उंच धातूचे प्रतिकात्मक शिल्प, अडीचशे मीटर लांबीचा वॉकींग प्लाझा, जीएफआरसी तंत्रज्ञानावर आधारित संभाजी महाराजांच्या जीवनपटाची, विचारधारांची व साहित्याची माहिती दर्शविणारे भित्तीचित्रे, भिमा नदीच्या घाटाचा विकास, बोटीचे फलाट विकसित करणे आदी कामे करण्यात येणार आहेत.