पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर रडला, स्वतःनेच केला खुलासा
चॅम्पियन्स ट्रॉफीत चांगली कामगिरी करूनही रडण्याचं कारण काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

पुणे : पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर आयपीएल स्पर्धेतील दुसरा महागडा खेळाडू आहे. पंजाब किंग्सने 26.75 कोटी रुपये खर्च करून त्याला आपल्या संघात घेतलं आहे. श्रेयस अय्यरवरील पंजाब किंग्सची गुंतवणून सुरुवातीच्या सामन्यात तरी योग्य असल्याचं दिसत आहे. आतापर्यंत खेळलेल्या तीन पैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच त्याचा फॉर्मही जबरदस्त आहे. असं असताना श्रेयस अय्यरने एक खुलासा केला आहे. त्याच्या मनातलं ऐकून त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. अय्यरने सांगितलं की, चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान अश्रू अनावर झाले होते. पण चॅम्पियन्स ट्रॉफीत चांगली कामगिरी करूनही रडण्याचं कारण काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. भारतासाठी सर्वाधिक धावा त्याने केल्या होत्या. पण दुबईत रडण्याचं कारण त्याने अभिनेत्री साहिबा बाली हिच्यासमोर केलं आहे. साहिबा बाली पंजाब किंग्स संघासोबत आहे. यावेळी तिने पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला काही प्रश्न विचारले.
हेही वाचा : विराट कोहलीने रचला इतिहास: टी-२० क्रिकेटमध्ये १३ हजार धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज
साहिबा बालीने श्रेयस अय्यरला विचारलं शेवटचं कधी रडला होता? तेव्हा अय्यरने सांगितलं की चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु होण्यापूर्वी रडलो होतो. अय्यरने सांगितलं की, ‘मी शेवटच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सराव शिबिरात रडलो होतो. नेटमध्ये माझ्याकडून हवी तशी फलंदाजी होत नव्हती. तेव्हा मला माझ्यावरच खूप राग आला होता आणि रडू कोसळलं. मला धक्का बसला होता नाही तर मी इतकं सहज कधी रडत नाही.’ श्रेयस अय्यरने पुढे सांगितलं की, ‘इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत मी चांगली कामगिरी केली होती. तेव्हा मला वाटलं की चांगल्या लयीत असेन. पण दुबईची खेळपट्टी वेगळी होती आणि पहिल्या दिवशी तिथली परिस्थिती समजून घेणं कठीण गेलं होतं. जेव्हा पहिल्या दिवशी सराव संपला तेव्हा मी आणखी सराव करू इच्छित होतो. तेव्हा मला संधी मिळाली नाही आणि मला राग आला.’
श्रेयस अय्यर सरावावेळी रडला हे खरं असलं तरी स्पर्धेदरम्यान त्याने विरोधी गोलंदाजांच्या डोळ्यात पाणी आणलं. अय्यरने आपल्या आक्रमक खेळीने पाच सामन्यात 243 धावा केल्या. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच अर्धशतकं टोकली. तर अंतिम सामन्यातही श्रेयस अय्यरने 48 धावांची खेळी केली. अय्यरने क्रिकेट कारकिर्दित पहिल्यांदा आयसीसी चषक जिंकला आहे. आता पंजाब किंग्सला जेतेपद मिळवून देण्याचं स्वप्न आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा