भारत उत्सव २०२५ मध्ये पुण्याचा ठसा..!
पुण्याचे हर्षल सुरुशे आणि विनायक काळे यांची मलेशियातही उल्लेखनीय कामगिरी

पुणे | अखिल लोककला सांस्कृतिक संघटना, पुणे यांच्या वतीने १६ ते २२ मे दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या “भारत उत्सव – २०२५” या अखिल भारतीय नाट्य, संगीत व नृत्य महोत्सवात पुण्यातील दोन युवा कलाकारांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
पुण्याचे हर्षल सुरुशे आणि विनायक काळे या कलाकारांनी जोडी नृत्य – आधुनिक शैली प्रकारात उत्कृष्ट नृत्याविष्कार सादर करत द्वितीय क्रमांक पटकावला. देशभरातून आलेल्या नामांकित कलाकारांच्या स्पर्धेत त्यांनी केलेले सादरीकरण विशेष ठरले. या महोत्सवाचे आयोजन “नववा सांस्कृतिक मंच” या व्यासपीठासाठी करण्यात आले होते.
हेही वाचा : कचऱ्यापासून खतनिर्मितीचा दापोडीतील शून्य कचरा प्रकल्प!

राष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या या यशानंतर हर्षल आणि विनायक यांनी भारतीय नृत्यकला जागतिक पातळीवर पोहोचवली. नुकत्याच मलेशियातील क्वालालंपूर येथे पार पडलेल्या “रिदम अॅण्ड एक्स्प्रेशन वर्ल्ड फेस्ट – २०२५” या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी जोडी नृत्य – लोकनृत्य शैली प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करत द्वितीय पारितोषिक पटकावले. भारतीय सांस्कृतिक वारसा सादर करून त्यांनी जागतिक व्यासपीठावर प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
या दोन्ही कलाकारांना मार्गदर्शन प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक रॉकी सॅम्युअल, पवन चंद्रगिरी आणि गोकुळ यांनी केले. हर्षल सुरुशे आणि विनायक काळे यांच्या या यशाबद्दल शहरभरातून कौतुक होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.





