पुणे महापालिकेची डिजिटल झेप; IWMS संगणक प्रणालीला राज्य सरकारचा पुरस्कार

पुणे : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धेत महापालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या IWMS संगणक प्रणालीस राज्यशासनाचा पुरस्कार मिळाला आहे. प्रशासनाचे कामकाज लोकाभुमिख करणे तसेच निर्णयक्षमता वाढविण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना हा पुरस्कार दिला जातो.
२० ऑगस्ट ते २ ऑक्टोबर या कालावधीत राज्यस्तरावर तसेच तालुका, जिल्हा, विभागीय स्तरावर व महानगरपालिका स्तरावर राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान राबविण्यात आले होते. मागील १६ वर्षांपासून हे अभियान राबविण्यात येत असून पुणे महापालिकेस पहिल्यांदा हा पुरस्कार मिळाला आहे. ही प्रणाली राबविण्यासाठी मागील तीन वर्षांपासून शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी विशेष जबाबदारी सांभाळली.
पुणे महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकानुसार मान्य विकासनिधीमधून पुणे शहरामध्ये विविध विकास कामे करण्यात येतात. सदर विकास कामांचे संपूर्ण तांत्रिक व प्रशासकीय कामकाज एकसंध, तंत्रशुद्ध, अचूक, गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि लोकाभिमुख होणेच्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेमार्फत नव्याने सीएसआरच्या माध्यमातून ही प्रणाली राबविली.
यात विकासकामाचे पूर्वगणकपत्र तयार करण्यापासून निविदा प्रक्रीये पर्यंतची सर्व कामे आॅनलाईन केली जातात. तत्कालीन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी त्यास मान्यता दिली होती. तर, त्याची सर्व विभागांसाठी अंमलबजावणीसाठी विद्यमान आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले यांनी पुढाकार घेतला होता.
या संगणक प्रणालीची अंमलबजावणी टप्प्या-टप्प्याने मागील तीन वर्षांपासून सुरू असून त्याची अंमलबजावणी पथ विभाग, पाणी पुरवठा विभाग, भवनरचना विभाग, मलनिःसारण देखभाल-दुरूस्ती विभाग, उद्यान विभाग, विद्युत विभाग इ. तसेच परिमंडळ अंतर्गत १५ क्षेत्रिय कार्यालयामध्ये प्रत्यक्ष करण्यात आलेली आहेत.