पिंपरीत ‘द बर्निंग वेनस्डे’
एचए कंपनीच्या आवारातील भंगार साहित्याला आग; तब्बल 10 बंबांच्या साह्याने आगीवर नियंत्रण

काळेवाडीत सहा वाहने जळून खाक
पिंपरी : पिंपरी – चिंचवड शहरात आगीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. हिंदुस्थान अँटीबायोटीक्स (एचए) कंपनीच्या आवारात दुपारी सव्वातीनच्या सुमारास वाळलेल्या गवताला आग लागल्याने त्या ठिकाणी असलेल्या भंगार साहित्याने पेट घेतला. तब्बल दहा बंबांच्या सहाय्यान आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन विभागाच्या जवानांना यशआले. तर, काळेवाडी येथे कचर्याने पेट घेतल्याने चारचाकी वाहनांना आग लागल्याने सहा वाहने जळून खाक झाली.
पिंपरी येथील एचए कंपनीच्या मागील बाजूस लोहमार्गालगत रेल्वे प्रशासनाने वाळलेले गवत पेटवले होते. त्यांनी ती आग विझविली होती. मात्र, काही वेळानंतर या आगीच्या ठिणग्या एचए कंपनी आवारातील गवतापर्यंत पोहोचल्या आणि गवताने पेट घेतला. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या भंगार साहित्यानेही पेट घेतला. आगीची वर्दी मिळताच महापालिका अग्निशमन दलाचे दहा ते बारा बंब घटनास्थळी दाखल झाले. भंगाराने पेट घेतल्याने आग आटोक्यात आणण्यास विलंब झाला. सांयकाळी उशिराने येथील आग आटोक्यात आली. पुन्हा आगीने पेट घेऊ नये, यासाठी सर्व परिसरात कुलींग करूनच जवानांनी बंब हलविले. काळेवाडी येथील ज्योतिबानगरमधील गणेश मंदिरासमोरील मोकळ्या जागेत वाहने पार्क केली जातात. पार्किंगच्या बाजूला कचरा साठला असून कचर्याने पेट घेतल्याने आजुबाजूच्या वाहनांनी पेट घेतला. यामध्ये सहा वाहने जळून खाक झाली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र, सहा वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिसरातील नागरिकांनी अग्निशमन विभागाशी संपर्क साधला असता अग्निशमन बंब वेळेवर पोहोचूनही अरूंद आणि चिंचोळ्या मार्गामुळे घटनास्थळापर्यंत बंब पोहोचू शकले नाही. त्यामुळे आणखी नुकसान झाले.
हेही वाचा – पुणे महापालिकेची डिजिटल झेप; IWMS संगणक प्रणालीला राज्य सरकारचा पुरस्कार
एचए कंपनीचा गलथान कारभार उघड
एचए कंपनीत ४ जून २०२० रोजी आग लागल्यानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी गेलेल्या महापालिका अग्निशमन दलाला एचए व्यवस्थापनाच्या अग्निशमन त्रुटी मोठ्या प्रमाणात निदर्शनास आल्या होत्या. एचए कारखान्यामधील अॅसिड टँक परीसरालगत इलेक्ट्रिकल वायरिंंग जमिनीलगत केलेले असून त्यावर कागदी पुठ्यांचे बॉक्स, प्लाास्टिकच्या व वैद्यकीय बॉटल्स, वाळलेले झाडे झुडपे, गवत साठविण्यात आलेले होते. तसेच, अन्य ज्वलनशील भंगार साहित्य अस्ताव्यस्त अवस्थेत ठेवण्यात आले आहे. कारखान्यामध्ये अग्निशमन कार्याकरिता आवश्यक पाणीपुरवठा उपलब्ध नव्हता. स्थायी अग्निशमन यंत्रणेचा वापर उपलब्ध तैनात सुरक्षा रक्षकाद्वारे करणे आवश्यक होते. परंतु, सदर स्थायी अग्निशमन यंत्रणा उपलब्ध झाली नाही. कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे, गवत वाढलेले असून ते वेळोवेळी छाटण्यात आलेले नसल्याने मोठ्या आगीचा धोका संभवतो. कारखान्यामध्ये प्रत्यक्ष आगीच्या परिस्थितीत सुरक्षित कार्य करण्याकरिता सुरक्षारक्षकांना व अन्य कर्मचार्यांना प्रशिक्षिण दिलेले नसल्याबाबतही निदर्शनास आले होते. याबाबत अग्निशमन विभागाने एचए कंपनीला नोटीसही दिली होती. मात्र, २०२० मध्ये नोटीस देऊनही कंपनी व्यवस्थापनाने कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचे बुधवारी लागलेल्या आगीतून समोर आले आहे.