पुणे-लोणावळा लोकलच्या प्रवासाला ४७ वर्षे पूर्ण
प्रवाशांसाठी सुविधा वाढवण्याची गरज

पुणे : पुणे ते लोणावळा दरम्यान धावणाऱ्या उपनगरीय लोकल रेल्वेने आपल्या प्रवासाचा ४७ वर्षांचा टप्पा पार केला आहे. ११ मार्च १९७८ रोजी सुरू झालेल्या या लोकलने गेल्या काही दशकांत मोठे बदल अनुभवले आहेत. मात्र, वाढत्या प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत अद्याप अनेक सुधारणा आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे.
सुरुवातीला केवळ ९ डब्यांची असलेल्या या लोकलचे २००८-०९ मध्ये १२ डब्यांपर्यंत विस्तार करण्यात आले. त्यानंतर २०१२ मध्ये तिचा वेग वाढविण्यात आला. २०२० पूर्वी या मार्गावर ४४ फेर्या चालत होत्या, मात्र कोरोना महामारीनंतर त्या ४० वर आल्या. नोव्हेंबर २०२३ मध्ये नव्या सिग्नल यंत्रणेच्या कार्यान्वयनामुळे रेल्वेच्या वेळापत्रकात सुधारणा झाली, ज्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला.
अजूनही अनेक अडचणी कायम
या मार्गिकेवर हळूहळू विकास होत असला तरी काही महत्त्वाचे मुद्दे अद्याप सुटलेले नाहीत. स्थानकांवरील स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांमध्ये सुधारणा होण्याची गरज आहे. अनेक नव्या पादचारी पूल अत्यंत उंचावर बांधले गेले असून, त्यामुळे मोठ्या वयोगटातील नागरिक व महिलांसाठी ते वापरणे कठीण होत आहे. आणखी एक गंभीर समस्या म्हणजे काही स्टेशनवर आपातकालीन प्रवेशद्वारांचा अभाव आहे.
हेही वाचा – शहराच्या सुरक्षेचा महापालिकेवर भार ?
उदाहरणार्थ, कान्हे स्थानकावर अधिकृत प्रवेशद्वार नसल्याने अनेक प्रवासी रेल्वे ट्रॅक ओलांडून मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचतात. वेगाने जाणारी गाडी अशा वेळी आली, तर हा प्रवास जीवघेणा ठरू शकतो. तसेच तळेगाव स्थानकाच्या एका प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी फक्त उंच पूल असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांगांसाठी ही मोठी समस्या बनली आहे.
दुपारच्या वेळी लोकल सेवा अपुरी
या मार्गावरील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दुपारच्या वेळी लोकलची अनुपलब्धता. याचा फटका मुख्यतः विद्यार्थी आणि कामगार वर्गाला बसतो. त्यांना स्थानकांवर ताटकळत बसावे लागते, कारण पर्यायी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नाही. प्रवाशांच्या सोयीसाठी दुपारच्या वेळेत अधिक फेऱ्या सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
वाढत्या औद्योगिकीकरणाचा विचार गरजेचा
पुणे-लोणावळा हा मार्ग फक्त प्रवासी वाहतुकीपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर या मार्गावर अनेक उद्योगधंदे आणि आयटी कंपन्यांचा मोठा विस्तार होत आहे. त्यामुळे शहराबाहेरून येणाऱ्या कर्मचारी वर्गाचा विचार करून रेल्वे प्रशासनाने या मार्गाला अधिक सक्षम करण्यासाठी ठोस पावले उचलायला हवीत.
४७ वर्षांचा वारसा; अधिक चांगल्या सुविधांची मागणी
पुणे-लोणावळा लोकल गेली ४७ वर्षे हजारो प्रवाशांचे जीवन सुकर करत आहे. मात्र, वाढत्या शहरीकरणामुळे या मार्गावर अजूनही मोठ्या प्रमाणात सुधारणा होण्याची आवश्यकता आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन स्वच्छता, सुरक्षितता, सोयी-सुविधा आणि स्थानकांची सुधारणा यावर भर द्यावा, अशी मागणी होत आहे.
या वर्धापन दिनानिमित्त, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.