पंढरपूर कार्तिकी यात्रेसाठी पुणे विभागाकडून १०० जादा एसटी बस

पुणे : पंढरपूर येथील कार्तिकी यात्रेनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी पुणे एसटी विभागाने विशेष व्यवस्था केली आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर ७ नोव्हेंबरपर्यंत पुणे विभागातून पंढरपूरकडे १०० जादा बसगाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले असून, मोठ्या प्रमाणावर प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी ग्रुप बुकिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या वर्षी आज (दि. २ ) भागवत एकादशी आणि दि. ५ नोव्हेंबरला कार्तिकी पौर्णिमा आहे. या कालावधीत राज्याच्या विविध भागांतून वारकरी आणि भाविक पंढरपूरकडे प्रस्थान करतात. त्यामुळे २ ते ५ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या यात्रेसाठी एसटी प्रशासनाने वाहतुकीची विशेष तयारी केली आहे. यात्रेनंतर भाविकांच्या परतीच्या प्रवासासाठीही दि. ७ नोव्हेंबरपर्यंत जादा बसेस चालवण्यात येणार आहेत.
हेही वाचा – आरोप, टीकेला आम्ही कामातून, विकासातून उत्तर देतो; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विरोधकांना उत्तर
भाविकांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे एसटी विभागाचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी केले आहे. त्यांनी सांगितले की, “शहरातील मुख्य बसस्थानकांवरून किमान ४० प्रवाशांचा गट तयार झाल्यास पंढरपूरसाठी स्वतंत्र बस उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे नागरिकांनी खासगी वाहतुकीऐवजी एसटीची सुरक्षित, सोयीची आणि परवडणारी सेवा वापरावी.”
पंढरपूर कार्तिकी यात्रेदरम्यान नेहमीप्रमाणे पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामती, इंदापूर, दौंड आदी ठिकाणांहून मोठ्या संख्येने वारकरी प्रवास करतात. त्यामुळे पुणे विभागाकडून वेळापत्रक, तिकीट आरक्षण आणि बसेसची उपलब्धता याबाबतची माहिती स्थानकांवर आणि ऑनलाइन प्रणालीतून दिली जाणार आहे.
पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी ही जादा बससेवा वाहतुकीचा ताण कमी करण्यास आणि भाविकांना वेळेत पोहोचण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. प्रशासनाकडून प्रवासादरम्यान सुरक्षितता, शिस्त आणि स्वच्छतेचे पालन करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.




