आरोप, टीकेला आम्ही कामातून, विकासातून उत्तर देतो; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विरोधकांना उत्तर

पंढरपूर : “विरोधकांच्या आरोपाला, टीकेला आम्ही कामातून, विकासातून उत्तर देतो. विकास, विकास आणि विकास हाच आमचा अजेंडा आहे. त्यामुळे आम्हाला विधानसभेत लँडस्लाइड यश मिळाले,” असे म्हणत महाविकास आघाडीच्या नेत्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. “जनतेचे प्रश्न सोडवणे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे हे सरकार आहे,” असेही ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा पंढरपूर येथे झाली. येथील श्री विठ्ठल मंदिरात छोटेखानी कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, भरत गोगावले,आमदार समाधान आवताडे, शरद पवार गटाचे माढ्याचे आमदार अभिजित पाटील आदी उपस्थित होते. या वेळी विरोधक मोर्चा काढून मतदारयाद्यांवरून सरकारला लक्ष्य करत आहेत, याबाबत विचारले असता, शिंदे म्हणाले, “खरे तर आज विठ्ठलाची मनोभावे पूजा करण्याचा मान मिळाला. राजकीय भाष्य अधिक करणार नाही. मात्र, मी मुख्यमंत्री असताना रखडलेल्या विकासाला गती दिली. अनेक कल्याणकारी योजना आणल्या. मुखमंत्री लाडकी बहीण योजना आजही राबवली जात आहे. आता देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात सरकार काम करत आहे. आम्ही कामातून विरोधकांना उत्तर देतो.”
हेही वाचा – पाणी साठवणुकीच्या खर्चात वाढ; किती कोटींनी वाढला खर्च?
“आम्ही राज्यातील जनतेसाठी काम करतो. विकासाची भूमिका घेऊन आम्ही काम करत आहोत. त्यामुळे जे आरोप, टीका करतात, त्यांना आम्ही कामाने उत्तर देतो. अजून पाऊस सुरू आहे. बळीराजा संकटात आहे. अशा वेळी सरकार बाजीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. त्यांच्यासाठी विशेष पॅकेज जाहीर केले असून, शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ पैसे जमा होत आहेत. आमचा अजेंडा केवळ विकास, विकास आणि विकासच आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कामाच्या जोरावर महायुतीला राज्यात चांगले यश मिळेल.” असेही या वेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
“पंढरपूरची चंद्रभागा नदी वारकऱ्यांची पवित्र गंगा आहे. ही चंद्रभागा कायमस्वरूपी प्रदूषणमुक्त व्हावी, यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून नगरविकास खात्याने चंद्रभागा प्रदूषणमुक्तीसाठी १२० कोटी रुपयांच्या निधीतून पहिल्या टप्प्यातील कामे सुरू केली आहेत. यामधून पंढरपूर शहरामध्ये ड्रेनेजसह मैलामिश्रित येणारे पाणी बंद केले जाणार आहे,” अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. “राज्यातील जनतेला, बळीराजाला समाधानी ठेव,” असे साकडे विठूरायाचरणी घातले असल्याचे शिंदे यांनी सांगितले.




