सॅाफ्टवेअर निर्यातीत पु्णे शहराचे तिसरे स्थान कायम

पुणेः राज्यात गेल्या पाच वर्षात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पुणे शहराने आघाडी घेतली असून आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. देशातील बंगळुरू आणि हैद्राबाद या शहरानंतर पुणे शहराचा सॅाफ्टवेअर निर्यातीत सर्वाधिक वाटा आहे. त्यानुसार सॅाफ्टवेअर निर्यातीत पुणे शहराचा देशात तिसरा क्रमांक लागत असून तो कायम ठेवण्यात आला आहे. पुणे शहरातील हिंजवडीत १९९० मध्ये राजीव गांधी यांचे इन्फोटेक पार्क सुरू करण्यात आले. यानंतर खऱ्या अर्थाने आयटी क्षेत्राला मोठी चालना मिळाली.
केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत देशातील सॅाफ्टवेअर निर्यातीची गेल्या पाच वर्षांतील आकडेवारीची माहिती सभागृहाला दिली. या आकडेवारीनुसार, देशातील सॅाफ्टवेअर निर्यातीत बंगळुरू ४ लाख ७ हजार ७७ कोटी रुपयांची आपली यशस्वी घोडदौड कायम ठेवली आहे. यानंतर हैद्राबादने देखील १ लाख २१ हजार ११५ कोटी निर्यात केली आहे. तर १ लाख ५ हजार ८१८ कोटी रुपयांची निर्यात करीत पुणे शहराने आपले स्थान कायम ठेवले आहे.
हेही वाचा – सोनं स्वस्त की महाग? जाणून घेऊयात वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात मौल्यवान धातूचे दर
सध्याच्या घडीला आयटी क्षेत्रात मोठी क्रांती झाली असून एआय या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सॅाफ्टवेअर निर्यातीत पुणे जिल्हा देशात तिसऱ्या स्थानावर कायम आहे. परिणामी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पुण्याची कामगिरी चांगली राहिलेली आहे. मात्र, असे असतानाही हिंजवडी भागातील आयटी कंपन्यांचे मूलभूत प्रश्न अद्यापर्यंत सोडवण्यात आलेले नाहीत. यातच वाहतूक कोंडीची मोठी समस्या येथे निर्माण झाली आहे. यावर देखील अद्यापर्यंत तोडगा निघू शकलेला नाही. या समस्यांसंदर्भात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी येथील कंपनीच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेत प्रलंबित असलेल्या समस्या सोडण्याची ग्वाही दिली.
हिंजवडी येथील आयटी कंपन्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत हिंडवडी इंडस्ट्रीज असोसिएशसोबत मंगळवारी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बैठक घेतली. या बैठकीत सामंत यांनी हिंजवडी असोसिएशनने मांडलेल्या १७ मुद्यांचा आढवा घेतला. यामध्ये आयटी पार्कमधील पर्यायी रस्ते, उड्डाणपूल, घनकचरा प्रकल्प यांचा समावेश आहे. या बैठकीला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता नितीन वानखेडे, प्रादेशिक अधिकारी अर्चना पठारे तसेच विविध उद्योग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या समस्येतील काही विषय मुख्यमंत्री कार्यालयाशी सबंधित असल्याने त्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन सामंत यांनी दिली.





