Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

अभिमान मराठीचा.. : पुण्यात सर्वव्यापी मराठीसाठी विश्वमराठी संमेलन !

मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांची माहिती : फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर सोहळा

पुणे : विश्वमराठी संमेलन हे मराठी भाषेच्या अस्मितेचे संमेलन आहे. 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारीला या कालावधीत हे संमेलन राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातील ऐतिहासिक फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होत आहे. मराठीला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे स्थानिक ते ग्लोबल अशा सर्व स्तरांवर मराठी भाषेचा जागर सातत्याने होत राहिला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक मराठी माणसाचे योगदान महत्त्वाचे आहे. या दृष्टीने विश्वमराठी संमेलनाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. विश्व संमेलनासाठी जगभरातील विविध देशांतील मराठीजन आवर्जून उपस्थित राहणार आहेत.

संमेलनात भरगच्च कार्यक्रम

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे पहिले विश्वमराठी संमेलन पुण्यातील ऐतिहासिक फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होत आहे. विश्व संमेलनात विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यामध्ये विज्ञान तंत्रज्ञानापासून अध्यात्मापर्यंत, बालसाहित्यापासून संत साहित्यापर्यंतच्या विषयांवर परिसंवाद, चर्चासत्र होणार आहेत. लहान मुलांपासून ज्येष्ठापर्यंत प्रत्येक घटकाशी संबंधित विषय या संमेलनात समाविष्ट करण्यात आले आहेत. यंदापासून मराठी भाषा सातासमुद्रापार नेणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकाला साहित्यभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. त्यानुसार या वर्षीचा साहित्यभूषण पुरस्कार पद्मश्री प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच संमेलनात कला, साहित्य, उद्योग, तंत्रज्ञान, प्रशासन, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग आहे. वाचन संस्कृतीला चालना द्यावी यासाठी पुस्तकांच्या 100 दालने असणार आहेत.

हेही वाचा  :  सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर २१ फेब्रुवारीपासून ‘पवनाथडी’ जत्रा 

सर्व क्षेत्रात मराठीचा वापर वाढवण्याचा प्रयत्न

मराठी भाषेला हजारो वर्षांची परंपरा लाभली आहे. अध्यात्म, साहित्य अशा विविध क्षेत्रांत विपुल लेखन मराठीमध्ये झाले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत इंग्रजीचा पगडा वाढला. मोठ्या संधी प्राप्त करण्यासाठी इंग्रजी शिकणे महत्त्वाचे या समजातून इंग्रजी माध्यमाचे प्राबल्य वाढले. मात्र, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणावर भर देण्यात आला आहे. त्याचा फायदा मराठीच्या प्रचार-प्रसारासाठी होणार आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण मराठी भाषेतून सुरू झाले आहे. येत्या काळात अन्य विद्याशाखांचे शिक्षणही मराठीतून उपलब्ध होईल. त्यामुळे शिक्षणापासून न्यायालयापर्यंत, विज्ञानापासून आरोग्यापर्यंत सर्वच क्षेत्रात मराठीचा वापर वाढवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आज इंग्रजीचे महत्त्व असले, तर मराठी पुढील पिढीला मराठी भाषा कळावी, मराठी भाषेचा सर्व स्तरांवर वापर वाढावा, भाषेचे संवर्धन आणि जतन व्हावे हा मराठी भाषा विभागाचा उद्देश आहे.

उद्योगासाठीही मराठी

उद्योग, नोकरीच्या निमित्ताने अनेक मराठीजन परदेशात स्थायिक आहेत. मात्र, त्यांची नाळ आजही मराठीशी, महाराष्ट्राशी जोडलेली आहे. मराठी भाषा पुढील पिढीपर्यंत नेण्यासाठी परदेशातील मराठीजन त्यांच्या स्तरावर प्रयत्नशील असतात. त्याशिवाय आणखी महत्त्वाची बाब म्हणजे, त्यांच्या माध्यमातून राज्यात गुंतवणूक रोजगार निर्मिती करणेही शक्य आहे. त्यासाठी विश्व संमेलन उपयुक्त ठरू शकते. भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसते. तर ती व्यवहार, उद्योगांनाही जोडणारी असते. त्यामुळे परदेशस्थ मराठीजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राला व्यापार, उद्योग निर्माण व्हावेत हाही सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी मराठीजनांना महाराष्ट्राशी, मराठीशी जोडण्यासाठी विश्वमराठी संमेलन महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे परदेशस्थ मराठीजनांशी जोडले जाण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातील मराठी माणसांसाठीही विश्वमराठी संमेलन महत्त्वाचे ठरणार आहे.

अभिनव उपक्रमांच्या संकल्पना

मराठी भाषेसाठी अभिनव उपक्रम राबवण्याचे नियोजन मराठी भाषा विभाग करत आहे. त्यात ‘लायब्ररी ऑन व्हील्स’ ही संकल्पना विभागस्तरावर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही संकल्पना जिल्हास्तरावर कशी राबविता येईल यादृष्टीनेही प्रयत्न करण्यात येतील. उद्योग आणि मराठीला एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू असून उद्योगांनी त्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) ग्रंथालयांना जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून निधी द्यावा यासाठी प्रयत्न सुरू ओहत. ग्रंथालयांच्या विकासासाठी त्यांच्या स्थापनेच्या कालावधीनुसार विकास निधी मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button