‘अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील’; बच्चू कडू यांचं विधान

मुंबई | अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील असे राजकीय संकेत आहेत, असं मोठं विधान प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी आणि महायुतीत बरीच फुट पडेल आणि त्यातून आमची महाशक्ती तयार होईल, असंही ते म्हणाले. बच्चू कडू मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
बच्चू कडू म्हणाले, पंकजा मुंडे यांनी विधानसभा लढवण्यासाठी जागा नाही, असं विधान केलं आहे. पंकजा मुंडे जे बोलल्या ते खरंच आहे. विधानसभेत धनंजय मुंडे आहेत. पण अजित पवार महायुतीबरोबर राहिले, तर धनंजय मुंडे यांना महायुतीचं तिकीट मिळेलं. अजित पवार यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, तर धनंजय मुंडे यांची जागा खाली होईल.
हेही वाचा – ‘मला मुख्यमंत्री बनायचं आहे. पण..’; अजित पवारांचं विधान चर्चेत
अजित पवार हे महायुतीतून बाहेर पडतील असं वाटतं का? असा प्रश्न विचारला असता, एकंदरित चित्र बघता, असं वाटतं की अजित पवार हे बाहेर पडतील. असे राजकीय संकेत आहेत. ज्याप्रमाणे पत्रकारांचे सूत्र असतात, तसे आमचेही आहेत. खरं तर आगामी विधानसभेपूर्वी महाविकास आघाडी आणि महायुतीत बरीच फुट पडणार आहे आणि त्यातूनच आमची महाशक्ती तयार होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
अजित पवार महायुतीतून बाहेर पडले तर तिसऱ्या आघाडीत सहभागी होतील का? असा प्रश्न विचारला असता. बच्चू कडू म्हणाले, अजित पवार आमच्याबरोबर येतील की नाही, हे आता सांगता येणार नाही, याबाबत आमची सुकाणू समिती निर्णय घेईल.





