‘सहा महिन्यात आणखी एकाची विकेट जाणार’; सुप्रिया सुळेंच्या विधानाने खळबळ

पुणे : शंभर दिवसात एक विकेट गेली आहे. सहा महिने थांबा आणखी एक विकेट जाणार आहे, असा गौप्यस्फोट सुप्रिया सुळे यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या रविवारी आयोजित आढावा बैठकीत सुळे बोलत होत्या. एकवेळ मी विरोधात बसेन, परंतु मी नैतिकता सोडणार नाही, असंही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले. सुप्रिया सुळेंच्या या विधानानंतर राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, ते जर या पक्षात असते तर मी या पक्षात नसते, त्यामुळे बरे झाले पक्ष फुटला. त्यांनी केलेल्या या प्रकारानंतरच खरी लढाई सुरू झाली. यावर मी आज पहिल्यांदा बोलले आहे. मला नको ते ठेकेदारांचे पैसे. त्यावर माझे घर चालत नाही. बीड येथील संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या घरी एकदा तरी जाऊन या. तुम्हाला कळेल, काय परिस्थिती आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पुढे म्हणाल्या, मला मिळालेल्या माहितीनुसार आणखी एक रिपोर्ट बाहेर आला आहे. त्यामध्ये देशमुख यांना मारहाण होत असताना त्यांना फोन आले होते. त्यावेळी हे या सर्व प्रकाराची गंमत बघत होते, किती ही विकृती आहे. हे वास्तव आहे. अवादा कंपनीला काम देऊ नये, म्हणून एका गृहस्थाने केंद्र सरकारला तीन पत्र दिली आहेत. पत्रही यांनीच द्यायची, खंडणीही यांनीच गोळा करायची, हा हक्काचा एक्का तोच आहे, असा आरोप सुळे यांनी केला.
हेही वाचा – शहराबाहेरील रुग्णांचा पालिकेच्या वैद्यकीय यंत्रणेवर ताण
मतदारांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. हार-जीत सुरूच असते. सहा महिने थांबा, आणखी एकाची विकेट जाणार आहे. त्यांचे नाव आताच जाहीर करणे योग्य नाही. परंतु जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो. हिंमत असेल, तर समोर येऊ लढ. ही लढाई खूप मोठी आहे. छोट्यांना घेरण्यापेक्षा जे ‘डबल डेंजर’ आहेत, त्यांच्याशी लढण्यात मजा आहे, असे म्हणत खा. सुळे यांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर टीका करत त्यांना आव्हान दिले.
औरंगजेब कबरीबाबत माझे मत असे आहे की, इतिहासकारांनी इतिहासाचा अभ्यास करावा आणि राज्याला रस्ता दाखवावा. खरा इतिहास आहे तो समोर आला पाहिजे. शिक्षण आरोग्य या सगळ्या विषयात आता सरकारने लक्ष घालावे. विरोधक आरोप करत आहेत की लोकशाही आहे. या राज्यात सर्वात जास्त खंडणीखोर कुठल्या पक्षात आहेत हे वेगळे सांगायला नको, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
बीड जिल्ह्यातील धनंजय नागरगोजे या शिक्षकाची आत्महत्या अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. शिक्षकांना आदराने ‘गुरुजी’ म्हटले जाते. हे गुरुजी भावी पिढ्या घडविण्यासाठी सदैव काम करीत असतात. त्यांचे प्रश्न व अडचणी शासनाने समजून घेतल्या पाहिजेत. शासनाने त्यांच्या विविध प्रश्नांबाबत सकारात्मक व संवेदनशीलतेने विचार करण्याची गरज आहे. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सुटले तर अशा घटना घडणार नाहीत. दिवंगत शिक्षक धनंजय नागरगोजे यांना न्याय देण्यासाठी शासनाने तातडीने पुढाकार घ्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.